पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस जवळ भीषण अपघात: चुलता पुतण्याच्या जागीच मृत्यु

योगेश राऊत,पाटस

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथील भागवतवाडी जवळ मालवाहतूक करणारा ट्रक आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात चुलता पुतण्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात गुरुवार (दिनांक १५) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पाटस जवळील भागवतवाडी येथे झाला.

वैभव सुधाकर हाके (वय १८), बिभीषण बालाजी हाके ( वय ३२, दोघेही रा. बंडगरवाडी ता बसवकल्याण, कर्नाटक ) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या चुलता पुतण्याची नावे आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी अँगलची वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक सोलापूर बाजूकडून पुणे दिशेला भरधाव वेगाने जात असताना भागवतवाडी जवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला.

या अपघातात ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला, पण ट्रकमधील चालक बिभीषण हाके व त्याचा पुतण्या वैभव हाके हे या अपघातात जागीच मरण पावले. हा अपघात एवढा भीषण होता की, लोखंडी अँगल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चेंदामेंदा झाला. ट्रकचे तुकडे रस्त्यावर विचित्र अवस्थेत पडले होते लोखंडी अँगल हे पुढच्या वाहन चालकाच्या केबिनमध्ये घुसल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस शिपाई समीर भालेराव, हनुमंत भागत, संदीप कदम, आदींनी घटनास्थळी धाव घेत ट्रक मधील मृतदेह बाहेर काढले.

Previous articleनव्या शैक्षणिक वर्षात जि.प.शाळा वडजाई येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
Next articleवीज कंत्राटी कामगारांना न्याय देणार : आभा शुक्ला प्रधान सचिव ऊर्जा यांची घोषणा