शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईतील पत्रकार काळ्या फिती लावून निदर्शने करणार

प्रतिनिधी श्रावणी कामत

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि राज्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस होत असलेले हल्ले या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता मुंबईतील पत्रकार काळ्या फिती लावून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मूक निदर्शने करणार आहेत. आज मुंबईतील पत्रकारांच्या विविध संघटनांची बैठक मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्ताहर कक्षात पार पडली. या बैठकीत मूक निदर्शन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

मुंबईतील पत्रकार संघटनांनी या निदर्शनामध्ये सहभागी व्हावे, असे सर्व संघटनांच्या प्रमुखांनी आवाहन केले आहे. आजच्या बैठकीत शशिकांत वारीशे निर्घृण हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत चालवावा. तसेच वारीशे यांची हत्या करणारा पंढरीनाथ आंबेरकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना मोक्का लावावा आणि हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावेत आणि वारीशे यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना ५० लाख रुपये सरकारने मदत द्यावी. आदी मागण्या आजच्या बैठकीत करण्यात आल्या.

या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त राही भिडे, अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, संयुक्त कार्यवाह विष्णू सोनवणे, बीयूजेचे इंदरकुमार जैन, मंत्रालय-विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, भगवान परब, म्हाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक पवार, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव दीपक कैतके, अध्यक्ष राजा अदाटे, महानगर पालिका वार्ताहर संघाचे श्रीरंग सुर्वे, मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल सिंह, आशिष सिंह, पत्रकार सुधाकर काश्यप, नाणार रिफायनरी विरोधी आंदोलनातील नेते सचिन चव्हाण, नरेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

Previous articleनैराश्य न बाळगता युवकांनी शेतीत रोजगाराच्या संधी शोधाव्या – राधाकृष्ण विखे पाटील
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकूर पिंपरी येथील अनाथाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप