‘एलिव्हेटेड रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत टोल वसुली नको ; नाशिक फाटा ते चांडोली रस्त्याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची स्पष्ट भूमिका

चाकण – नाशिक फाटा ते चांडोली दरम्यानच्या एलिव्हेटेड रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत टोल वसुली नको अशी भूमिका घेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून टोल वसुली बंद करण्याची मागणी केली आहे.

दोन वेळा भूमिपूजन झाल्यानंतरही नाशिक फाटा ते चांडोली दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे गेल्या ८-९ वर्षांपासून नागरिक सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा टोल आकारल्यास जनक्षोभ होऊ शकतो असा इशारा देऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी चौपदरीकरणाचा खर्च वसुल झाल्यानंतर गतवर्षी टोल आकारणी बंद करण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याच्या स्थितीत काहीच फरक पडलेला नाही, याकडे केंद्रीयमंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा समस्या विचारात घेऊन केंद्रीयमंत्री गडकरी टोल वसुली स्थगित करण्याचे आदेश देतील अपेक्षा खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

एलिव्हेटेड रस्त्याच्या कामासाठी डीपीआर बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असले तरी निविदा प्रक्रिया व तांत्रिक बाबींचा विचार करता प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो. मग आतापासूनच वाहनचालकांना भुर्दंड कशासाठी ही जनभावनाच खासदार डॉ. कोल्हे यांनी मांडली असल्याचे यावरुन दिसून येते.

Previous article“क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले सन्मान २०२३” पुरस्कार देऊन सन्मान : टिळेकरवाडी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम
Next articleदौंड येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा : भारतीय पत्रकार संघाकडून रुग्णांना फळे वाटप