ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने २३ वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू

नारायणगाव (किरण वाजगे)

विद्या रमेश कानसकर ही २३ वर्षीय विवाहित महिला आपल्या पती व आईसोबत दुचाकीवरून जात असताना वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील भागेश्वर सहकारी दूध संस्थेच्या समोरील रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्युमुखी पडली. ही घटना आज दि. १४ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर अशा पद्धतीचा अपघात होऊन एक जण मृत्युमुखी पडला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचा वारूळवाडी ते सावरगाव मार्गे चिंचोली रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दरम्यान हा रस्ता तात्काळ सुरळीत करून वारंवार होणारे असे अपघात टाळावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेचे फिर्यादी व मृत महिलेचे पती रमेश कानसकर हे आपल्या दुचकी (एम.एच १४ बी.एच.३७६) वरून नारायणगाव ते दौंडकरवाडी, निमदरी येथे त्यांची सासू विमल धनंजय जाधव व पत्नी विद्या यांच्यासोबत दुचाकीवरून जात होते.

त्याच वेळी भागेश्वर दूध डेअरी च्या समोर एक ट्रॅक्टर (एम.एच.१३ जे. ५३००) दोन ट्रॉली सह नारायणगावच्या दिशेला जात असताना उसाने भरलेल्या पहिल्या ट्रॉलीचा धक्का लागून विद्या कानसकर या ट्रॉलीच्या मागच्या चाकाखाली पडल्या त्यांच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती नारायणगाव पोलिसांनी दिली. ट्रॅक्टर चालकाचे नाव गोरक्ष सुखदेव ढेंबरे (रा. साकुर ता. संगमनेर, जि. नगर) असे आह. या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Previous articleनारायणगाव येथे पुन्हा एकदा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
Next articleएस एम जोशी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न