नारायणगाव येथे पुन्हा एकदा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव (ता.जुन्नर) येथील खेबडेमळा शिवरातील मयूर गेनभाऊ खेबडे यांच्या चिक्कूच्या बागेत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात १ पूर्ण वाढ झालेला बिबट्या जेरबंद झाला. ही घटना रविवार दिनांक १३ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास समजली. दरम्यान बिबट्या ज्या ठिकाणी जेरबंद झाला त्याच्या शेजारी असलेल्या उसाच्या शेतात आणखी एक बिबट्या गुरगुरताना अनेकांनी ऐकले. त्यामुळे पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पिंजऱ्यासह शेताबाहेर काढताना बिबट रेस्क्यू टीम सदस्य तसेच वन विभागा च्या कर्मचाऱ्यांना मोठी वाट पाहायला लागली.

या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले असून याप्रसंगी वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन विधाटे, वन कर्मचारी खंडू भुजबळ, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे, रमेश सोलाट, हेमंत कांबळे, दीपक खुडे, लोखंडे, शिंदे, तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

अनेक दिवसांपासून आर्वी नारायणगाव या दोन गावांच्या सीमेवर दोन बिबट्या व त्याचे बछडे वावरत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान येथील अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून त्यांना फस्त केले आहे. गेल्या दोन महिन्यात नारायणगाव परिसरात सुमारे चार बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून नारायणगाव, वारूळवाडी, आनंदवाडी, मांजरवाडी, गुंजाळवाडी, कोल्हे मळा, येडगाव आदी परिसरात बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांना फस्त केले आहे.

Previous articleशिक्रापुर येथील श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमात ३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Next articleट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक डोक्यावरून गेल्याने २३ वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू