नाणेकरवाडी येथील शिक्षकाच्या प्रसंगावधनतेमुळे वाचले कासवाचे प्राण

चाकण- नाणेकरवाडी येथील प्राथमिक शिक्षक प्रवीण पाटील हे शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना त्यांना काही लोक हातात कासव घेऊन कुरुळी येथील ओढ्याच्या बाजूने येताना दिसले.श्री पाटील यांनी त्या लोकांना हटकून त्यांच्याकडून ते कासव ताब्यात घेऊन वन्यजीव अभ्यासक आणि चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीमचे रेस्क्युअर डॉ. बापूसाहेब सोनवणे यांच्या ताब्यात दिले.

यावेळी मुटकेवाडीचे मुख्याध्यापक प्रविणकुमार घोडे सर आणि सर्पमैत्रीण शगुफ्ता हे उपस्थित होते.त्यांनी ते कासव वनविभागात नोंद करून चक्रेश्वर येथील तलावात सोडून दिले.

मुख्यतः दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येणारी भारतीय मृदू कवचाची कासवे ही नदी,दलदलीच्या ठिकाणी, तलाव इत्यादी ठिकाणी दिसून येतात. त्यांची लांबी ही तीन फुटांपर्यंत असून गांडूळ, मासे हे त्यांचे खाद्य असते. बाहेरील देशात या कासवांना खाण्यासाठी मारले जाते तर याची तस्करीही करण्यात येते. त्यामुळे या कासवांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन कासव आढळून आल्यास त्यांना तात्काळ बाजूला असलेल्या पाणथळ जागेत सोडावे, असे आवाहन वन्यजीव अभ्यासक डॉ बापूसाहेब सोनवणे यांनी केले आहे.

भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा१९७२अंतर्गत अनुसूची १ ते ४ मध्ये समाविष्ट होणारे कुठलेही वन्यजीव कोणत्याही उद्देशाने जवळ बाळगणे गुन्हा ठरतो. त्यानुसार वन किंवा वन्यजीव विभागाकडून कारवाईदेखील केली जाते. कासवांच्या बहुतांश प्रजाती या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत; मात्र त्याविषयीची माहिती नसल्यामुळे कासव पाळण्याचा छंद हा अडचणीत आणू शकतो.

कासवांच्या या प्रजाती पाळू नयेत

भारतीय वन्यजीव संस्थाकडून कासवांच्या काही प्रजातींविषयीची माहिती देण्यात आली आहेत. या प्रजाती कोणताही व्यक्ती स्वत:जवळ कायद्याने बाळगू शकत नाही. बहुतांश कासव प्रजाती या इंटरनॅशनल युनिअन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या लाल यादीत तसेच चिंताजनक, धोकादायक स्थितीत अशा वर्गवारीत समाविष्ट आहेत.

अनुसूची-१ मधील कासवांच्या प्रजाती

१) भारतीय मृदू कवचाची कासव

२)आसाम रुफ टर्टल

३) कोचिन फॉरेस्ट केन टर्टल

४) इंडियन फ्लॅपशेल टर्टल

५) इंडियन लीफ टर्टल

६) इंडियन पिकॉक सॉफ्टशेल टर्टल

७), इंडियन रुफ टर्टल आदी.

कासवांना वन्यजीव कायद्याचे ‘संरक्षण’

कासवांच्या सर्वच प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार संरक्षित आहेत. त्यामुळे कासव कुठल्याही उद्देशने पकडणे, विकणे किंवा विकत घेणे आणि पाळणे बेकायदेशीर ठरते. वाढते जल प्रदूषण आणि कासवांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत असल्यामुळे दिवसेंदिवस कासवांची संख्या कमी होत चालली आहे. नैसर्गिक अन्नसाखळीतील महत्त्वाची भूमिका बजावणारे कासव नाहीसे झाल्यास त्याचे मोठे गंभीर परिणाम पृथ्वीतलावर बघावयास मिळू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तस्करीचा मोठा धोका

जंगलातील तलावांमध्येसुद्धा कासवांची संख्या घटू लागली आहे. कारण कासवांच्या तस्करीचे प्रमाण हे वाढू लागले आहे. उत्तरप्रदेश राज्य हे कासवांच्या तस्करीचे केंद्र समजले जाते. महाराष्ट्र आणि बंगालमधून सॉफ्टशेल टर्टल, कर्नाटकमधून अंदनी कासव अशा विविध राज्यांतून विविध प्रजातीच्या कासवांची तस्करी उत्तर प्रदेशच्या दिशेने केली जाते.

Previous articleदुर्गा माता सेवा मंडळाच्या वतीने श्री कुंकू मार्चन व कन्या पूजन कार्यक्रम संपन्न
Next articleनारायणगावात श्री मुक्ताई देवी पालखी ग्राम प्रदक्षिणा, रास दांडिया, रावण दहन आदी भरगच्च कार्यक्रमांनी नवरात्रोत्सवाची सांगता