७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संत निरंकारी मिशनच्या वतीने भवरापूर येथे १५००० वृक्षांची लागवड

उरुळी कांचन

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ २१ ऑगस्ट, २०२१ रोजी करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण भारतातील अनेक राज्यांच्या ३७५ हुन अधिक शहरांमध्ये दिवसेंदिवस या वृक्ष लागवडीच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या परियोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यात मागील वर्षांपासून नानगाव ब्रँच मधील खुटबाव, लोणावळा ब्रँच मधील कामशेत, पाषाण(सुतारवाडी), कोरेगावमुळ येथे २१००० पेक्षा अधिक वृक्ष लावण्यात आले आहेत. या वर्षी देखील मिशनच्या माध्यमातून १४ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या विविध शहरांमध्ये अनेक नव्या ठिकाणाचा समावेश होत आहे.

यादिवशी पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील भवरापूर या ठिकाणी वननेस -वन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. वन विभागाकडून वृक्षारोपण करण्यासाठी या ठिकाणी ५७ एकर जमीन उपलब्ध करण्यात आली असून १४ ऑगस्ट २०२२, रविवार या दिवशी आठ एकरमध्ये १३४ प्रजातींच्या १५००० वृक्षांची लागवड करण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नदीपासून लागवड क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

या कार्यक्रमाला सरपंच सचिन सातव, पंचायत समितीचे मा.सदस्य सुभाष जगताप, प्रवक्ते विकास लवांडे, मा.प.स.सदस्य धनंजय साठे, सरपंच कविता जगताप, सरपंच राजेंद्र कांचन, सरपंच तानाजी चौधरी, वन परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, किरण धायगुडे, मा.जि.प.सदस्य महादेव कांचन, पु.जि.नि.स. सदस्य संतोष कांचन, प.स.सदस्या हेमलता बडेकर, शामराव गावडे, सारिका लोणारी, मा.सरपंच दत्तात्रय कांचन, अजिंक्य कांचन, विकास जगताप, बबनराव साठे, सुभाष साठे, आण्णा साठे, योगेश साठे, हनुमंत साठे, वन विभाग मंगेश सपकाळे, अशोक गायकवाड, अमित कांचन, ऋषीकेश शेळके, सुनिल तुपे, आबासाहेब चव्हाण, सुभाष बगाडे, सुचिस्मिता वनारसे, पुजा सणस उपस्थित होते.

संत निरंकारी मिशनचे ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी), सेवादलाचे क्षेत्रीय संचालक, संयोजक तसेच स्थानिक प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादलचे स्थानिक अधिकारी, संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन चे स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम करुन वृक्षारोपणासाठी जमिनीचे सपाटीकरण करणे, खड्डे खोदणे तसेच पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे कार्य गेले आठ दिवस करीत आहेत. संत निरंकारी मिशनचे सेवादार वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे त्यांची देखभाल करतील, त्यामध्ये वृक्षांचे रक्षण, खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादिंचा समावेश आहे.

हे सर्व विदित आहे की, संत निरंकारी मिशन हे एक विश्वस्तरीय आध्यात्मिक व्यासपीठ आहे जे सर्वांभूती निराकार ईश्वराची अनुभूती बाळगून प्रेम, सहिष्णुता व सद्भावपूर्ण एकत्वाच्या विचारधारे मध्ये विश्वास बाळगते. मिशनमार्फत पर्यावरण सुरक्षेसाठी सातत्याने कार्य करण्यात येत आहे, तसेच वेळोवेळी देशभर वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण, जल संरक्षण, घनकचरा प्रबंधन, रक्तदान शिबीर, स्वछता अभियान यांसारख्या अभियानांमध्ये पुढाकार घेत आले आहे.

Previous articleसंपूर्ण नारायणगाव वारूळवाडी झाले तिरंगामय
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या उरुळी कांचन शहर उपाध्यक्षपदी जयंत काकडे यांची निवड : जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र