दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकसह ५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

उरुळी कांचन

गोवा राज्य निर्मित व फक्त गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी मद्याची पुष्पा चित्रपटातील स्टाईलने अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाच्या पथकाने थरारक पद्धतीने पाठलाग करून दोन परप्रांतीयांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ट्रकसह मद्य असा एकूण ५९ लाख ९ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी ट्रकचालक बाबुलाल गेवरचंद मेवाडा (वय ५२) व ट्रक क्लिनर संपतलाल भवरलाल मेवाडा (वय ३०, दोघे रा. रतनपुरा, पो. बदनूर, ता. आशिंद, जि. भिलवाडा राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे. उपअधीक्षक, पिंपरी-चिंचवड, राज्य उत्पादन शुल्क युवराज शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव विभाग,पुणे कार्यालयाच्या पथकामार्फत ६ जुलै रोजी मुंबई-बंगळुरु महामार्गावर वळवून गावच्या हद्दीतून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून मद्याची वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली होती.

यानुसार निरीक्षक तळेगाव दाभाडे संजय सराफ,निरीक्षक एफ विभाग पिंपरी डी. एस. जानराव,निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बी विभाग, ठाणे एस. बी. पाटील, स्वाती भरणे, प्रमोद कांबळे, एन. आर. मुंजाळ, ए. पी. बडदे, दुय्यम निरीक्षक आशिष जाधव, डी.बी. गवारी, आर.सी. लोखंडे, एस. वाय. दरेकर, जवान रसूल काद्री, एस.डी. गळवे, एम.आर राठोड, भागवत राठोड, अक्षय म्हेत्रे, रावसाहेब देवतुळे, अतुल बारंगुळे, हनुमंत राऊत यांच्या पथकाने लोणावळ्यातून जाणाऱ्या बाह्य रस्त्याच्या परिसरात सापळा लावून विदेशी मद्याची पुष्पा चित्रपटातील स्टाईलने अवैधरीत्या वाहतूक करणारा टाटा कंपनीचा एक एलपीटी २५१५ प्रकारचा दहाचाकी ट्रक क्रमांक आरजे २७ जीए ७२५६ जप्त करून कारवाई करण्यात आली. सदर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये रॉयल चॅलेंज प्रिमियम ७५० मिली क्षमतेच्या प्रतिबॉक्स १२ बॉटल याप्रमाणे ४८ बॉक्स, मॅकडोल नं. १, रिझर्व्ह व्हिस्की ७५० मिली क्षमतेच्या प्रतिबॉक्स १२ बॉटल याप्रमाणे ४४७ बॉक्स, टुबर्ग प्रिमियर बीअर ५०० मिली क्षमतेच्या प्रति बॉक्स २४ टीन याप्रमाणे ४२ बॉक्स असे एकूण ४० लाख ११ हजार ८४९ रुपये किमतीचे मद्य तसेच बिल्टी रोख रक्कम, भ्रमणध्वनी संच, दोन निळ्या रंगाच्या ताडपत्री, असा सर्व टाटा कंपनीचा दहाचाकी ट्रक असा एकूण ५९ लाख ९ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई, कांतीलाल उमाप, संचालक, दक्षता व अंमलबजावणी, सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त, पुणे विभाग, ए. बी. चासकर, अधीक्षक सी.बी.राजपूत, उपअधीक्षक एस. आर. पाटील, युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Previous articleबोगस सोयाबीन बियाणे विक्री करताना स्टिंग ऑपरेशन करून दोघे जण ताब्यात
Next articleशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त “विठू माऊली माझी अभंगवाणी” कार्यक्रमाचे आयोजन