नारायणगावात हाणामारी मध्ये एकाचा खून

किरण वाजगे

नारायणगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये पुणे नाशिक महामार्गावरील वारूळवाडी येथील जयहिंद टायर्स या दुकानाच्या वर असलेल्या राहत्या खोलीमध्ये एका कामगाराचा गळा दाबून खून झाल्याची घटना घडली आहे. त्या दुकानात कामाला असलेल्या दोन बिहारी कामगारांच्यामध्ये झालेल्या हाणामारीत एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसरा कामगार फरार झाला आहे. शवविच्छेदन अहवालावरून या कामगाराचा मृत्यू गळा दाबून झाल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. ही घटना बुधवार दिनांक ११ रोजी रात्री बारा वाजल्या नंतर घडली असावी असा अंदाज नारायणगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सकाळी दुकानाचे मालक मनोज कोनंगत हे दुकानात आले असता टायर दुकान अजून का उघडले नाही म्हणून दुकानाच्या वरती खोलीमध्ये राहत असलेल्या कामगारांना पाहायला गेले असता, एक कामगार खाली पडून त्याच्या छातीवर व कपड्यांवर रक्ताचे डाग आढळलेले त्यांना दिसले. तसेच दुसरा कामगार तेथे दिसून आला नाही. त्यामुळे मनोज यांनी पोलिसांना ही माहिती कळवली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मोहंमद नब्बास फूल मोहंमद हे खून झालेल्या बिहारी कामगाराचे नाव आहे तर कुमार बिहारी हा कामगार फरार झाला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस हवालदार संतोष कोकणे, दिनेश साबळे, काळुराम साबळे, सुरेश गेंगजे, संतोष दुपारगुडे, धनंजय पालवे, शैलेश वाघमारे व सचिन कोबल यांनी तपास व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.

Previous articleनारायणागावात गोळीबार करून दहशत पसरवणा-या गुन्हेगारांना पकडण्यात पोलीसांना यश ;२४ तासात आरोपीनां केले जेरबंद
Next articleपेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस G S T च्या कक्षेत आणुन महागाई वर नियंत्रण आणा- भारतीय मजदूर संघाची मागणी