जि.प. शाळांमध्ये चांगल्या सुविधा देत गुणवान विद्यार्थी घडवा- राज्यमंत्री कु.अदिती तटकरे

चाकण – जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देत गुणवान विद्यार्थी घडावावे, अशी अपेक्षा माहिती व जनसंपर्क, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कु. अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

खेड तालुक्यातील मौजे धामणे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, निर्मला पानसरे, तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे, गट विकास अधिकारी अजय जोशी, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजाराम लोखंडे, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, सरपंच महेंद्र कोळेकर, मुख्याध्यापक धर्मराज पवळे आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, धामणे गावातील शाळा निसर्ग वादळात उद्ध्वस्त झाली होती. राज्य शासनाच्या प्रयत्नातून आता ही शाळा नव्याने उभी राहिली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे, त्यासोबत त्यांनी क्रीडा क्षेत्रातही शाळेचे नाव उज्वल करावे यासाठी शाळेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जिल्हा नियोजन निधीतून ५ टक्के निधी राखून ठेवला जात आहे त्याचा पुरेपूर वापर करावा. या परिसरात प्रादेशिक पर्यटनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून अभ्यास सहलींचे नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.

आमदार मोहिते पाटील म्हणाले, धामणे गावातील जिल्हा परिषदेची शाळा निसर्ग वादळाने उद्ध्वस्त झाल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता. मुलांच्या शाळेची गैरसोय होऊ नये म्हणून ४५ लाख रुपये खर्चून ही नवीन भव्य शाळा नव्याने उभी केली. खेड तालुक्यात सिंचनाची कामे झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृती दिनानिमित्त राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Previous articleनारायणगाव महाविद्यालयात “वाणिज्य शाखेमधील संधी” या विषयावर व्याख्यान उत्साहात
Next articleदौंड शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा