राष्ट्रपती पदकासह ५८ पदकविजेत्या पोलिसांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Ad 1

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकासाठी महाराष्ट्रातील पाच अधिकाऱ्यांची, पोलिस शौर्य पदकासाठी चौदा अधिकाऱ्यांची, प्रशंसनीय सेवेसाठीच्या पोलिस पदकांसाठी ३९ अधिकाऱ्यांची, अशी एकूण ५८ अधिकाऱ्यांची झालेली निवड महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान वाढवणारी व कर्तबगारीवर शिक्कामोर्तब करणारी असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदक विजेत्या महाराष्ट्र पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान उत्कृष्ट सेवेची महाराष्ट्र पोलिसांची गौरवशाली परंपरा कायम असून यापुढेही ती सुरु राहील असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट पोलिस सेवेसाठी जाहीर होणाऱ्या पदकांची घोषणा आज करण्यात आली. देशभरातील एकूण ९२६ पोलिस पदकांपैकी महाराष्ट्राला ५८ पदके मिळाली आहेत. या दिमाखदार कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र पोलिस जीवाची जोखीम पत्करुन कर्तव्य बजावत असून आपल्या कामगिरीची नोंद इतिहासात घेतली जाईल असे सांगून कोरोनाविरुद्धच्या लढाईत मृत्यू पावलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.