पावनखिंड चित्रपटा बरोबरच मगरपट्टा-अमनोरा सिटीच्या सहलीने भारावले चिमुरडे : सह्याद्री प्रतिष्ठान व अस्तित्व कला मंचचा उपक्रम

उरुळी कांचन

पहिल्यांदाच पाहिलेले सोन्याचे झाड, उंच आकाशात घुसलेल्या इमारतींचे टॉवर, सरकत्या जिन्यावरील प्रवास, भव्य मॉल, त्यातील कल्पनेपलिकडील झगमगाट आणि पुस्तकातील इतिहास पडद्यावर जीवंत पाहण्याचा थरार ग्रामीण व आदीवासी भागातील चिमुरड्यांनी नुकताच मगरपट्टा व अमनोरा सिटीमध्ये अनुभवला. निमित्त होते, हडपसर येथील अस्तित्व कलामंच व कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथील सह्याद्री प्रतिष्ठान तसेच जिल्हापरिषद शाळेच्या वतीने चिमुकल्यांसाठी आयोजित केलेल्या “पावनखिंड’ या चित्रपटाचे.

कान्हेवाडी बुद्रुक, सहाणेवाडी व ठाकर समाज आदीवासी वस्तीतील जिल्हापरिषद शाळेमधील चिमुकल्यांसाठी मगरपट्टासिटीतील सिझन मॉलमध्ये “पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना मॉल व चित्रपटासह अमनोरा सिटीतील सुवर्ण वृक्ष, गगनचुंबी टॉवर, कृत्रीम सरोवर, खुले सभागृह दाखविण्यात आले. दरम्यान, चित्रपटातील पात्रांच्या ऐतिहासिक संवादाबरोबर प्रेरित होऊन विद्यार्थी छत्रपतींच्या नावाचा जयघोष करून आनंद घेत होते. मध्यंतरास चित्रपटाचे पार्श्वगायक अवधूत गांधी यानी व्हिडीओ कॉलवरून चिमुकल्यांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही त्यांना हात उंचावून आनंद व्यक्त केला. सरकत्या जिन्यावरील प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी आश्चर्यचकित करणारा होता. आपल्या भिरभिरत्या नजरेने या विद्यार्थ्यांनी काही वेळातच हे नाविन्य डोळ्यात साठवून घेतले. सकाळी मिळालेला नाश्ता आणि दुपारच्या भोजन व्यवस्थेने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. अमनोरा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे व उपाध्यक्ष सुनील तरटे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन गप्पा मारल्या व कौतुक केले.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास पुस्तकातून वाचला आहे. राजांबद्दल निष्ठा ठेवणारे शिवा काशिद सारखे सवंगडीही ऐकले आहेत. मात्र, पावनखिंड चित्रपट पाहताना हे सगळे समोर घडल्यासारखे वाटले. प्रसिद्ध मोठ्या सिटी, त्यामधील इमारती, रस्ते, मॉलमधील आकर्षक गोष्टी पाहताना खूप आनंद वाटला,’ अशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

अस्तित्व कलामंचाचे योगेश गोंधळे, धीरज दरवडे, श्रुतिका चौधरी, डॉ अश्विनी शेंडे, प्रमिला लोखंडे, अश्विनी सुपेकर, पल्लवी धुरू आदी पंधरा स्वयंसेवकांसह सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल, कार्यकर्ते राहुल निमसे, विनायक रूके, देवेंद्र सहाणे, विलास कोबल, मुख्याध्यापक सुरेशराव नाईकरे, शिक्षक राजेंद्र थोरात गणपत खैरे, रोहीणी बेल्हेकर, गोरक्ष मुळुक शंकर बुरसे, संजय घुमटकर, वैजयंता नाईकडे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.

विश्वनाथ गायकवाड, रविंद्र थोरात, मिलिंद कोबल, संतोष बेंडुरे, दिलीप मांजरे, चंद्रकांत कोबल, शंकर कोबल, विनोद कोबल, संतोष सावंत, चंद्रकांत सहाणे, रोहिणी तुपे यांनी सहकार्य केले.

Previous articleमराठी भाषा गौरव दिन संपन्न
Next articleशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार  प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना जाहीर