रांजनी येथे शेतीपंपाच्या विद्युत केबलची चोरी

आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील वाकोबामळा येथे नदी कडेला असलेल्या शेतकऱ्यांच्या २२ विद्युत पंपाचे केबलची चोरी अज्ञात चोरांनी केली असल्याची घटना घडली आहे. हा प्रकार शनिवार (दि.२२ ) रोजी रात्रीच्या सुमारास घडला असून वारंवार घडणाऱ्या या केबल चोरीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

रांजनी वाकोबा मळा येथे नदीचे कडेला जवळ पासचे २० ते २२ इलेक्ट्रॉनिक पाण्यातील मोटारी असून चोरट्यानी मोटर पासून ते खोके पर्यंत लावण्यात आलेल्या सहा एम.एम जाडीची केबल तोडून नेल्या आहेत. या मध्ये शेतकरी मधुकर रामचंद्र हांडे मारुती बाबुराव भोर, संतोष राघू वाघ, बाबाजी सिताराम वाघ, रामदास नाना वाघ, भाऊ बन्सी वाघ, बाबाजी साधू वाघ, शंकर कोंडाजी उकिरडे , ज्ञानेश्वर भिकाजी भोर, राजेंद्र भगतसिंग वाघ, भरत हरकू वाघ, रामदास दशरथ वाघ, शांतीलाल रघुनाथ भंडारी या सर्व शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेले असून या सर्वांचे मिळून एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

केबलची चोरी झाल्याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी मंचर पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे.मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय मांडवे पो.ना.राजेंद्र हिले ,पो.शि. रावते व पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास एस.आय मांडवे करत आहेत. दरम्यान नदीकाठी असलेल्या मोटारींचे केबलची चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच केबल चोरीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने पिकाचे नुकसान होत असून पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Previous articleवळती येथे गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला
Next articleश्री कुलस्वामी को-ओपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा व्यवहार पारदर्शक – माजी अध्यक्ष शरद सोनवणे