वळती येथे गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला

आंबेगाव तालुक्यातील वळती येथे घराशेजारी गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना (दि.२३) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात वंदना कैलास हिंगे (वय ४५) ही महिला जखमी झाली असून तिच्यावर मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वळती येथील काटवाण वस्ती येथे वंदना हिंगे या कुटुंबासह राहत असून त्या सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शेतात गवत कापण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या कमरेला बिबट्याचे दोन दात घुसले आहेत. यावेळी त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला व त्यानंतर त्या घराकडे पळत येऊन कुटुंबियांना माहिती दिली. त्यांचे पती कैलास हिंगे यांनी त्यांना पुढील उपचारासाठी मंचर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जखमी वंदना हिंगे यांची विचारपूस करत माहिती घेतली आहे. दरम्यान आंबेगाव तालुक्यात हल्ले वाढले असून याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Previous articleश्रीक्षेत्र ओझर येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Next articleरांजनी येथे शेतीपंपाच्या विद्युत केबलची चोरी