सोन्याचे अडीच तोळे वजनाचे दागिने व दोन मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत

नारायणगाव,किरण वाजगे

सुमारे २ वर्षांपूर्वी भर वस्तीत राहणाऱ्या कुटुंबाच्या घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व दोन मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.

सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गंठण व दोन मोबाइल नारायणगाव पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत करून सर्व मुद्देमाल मूळ मालकाला आज पोलीस स्थानक आवारात परत दिला. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की, गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८१/२०२० नुसार भारतीय दंड विधान कलम ३८० प्रमाणे फिर्यादी मंदार श्रीकांत दिवटे (रा. वाजगे आळी, नारायणगाव) यांच्या राहत्या घरातून सुमारे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण व दोन मोबाईलची आरोपी सागर मनोज विटकर व एक अन्य आरोपी (दोघेही रा. नारायणगाव) यांनी चोरी केली होती.

चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर जुन्नर न्यायालयाच्या आदेशान्वये मंदार दिवटे व त्यांच्या पत्नी जयश्री दिवटे यांना आज मुद्देमाल परत देण्यात आला. हा ऐवज देते प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, पोलिस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.आपला मूळ मुद्देमाल परत मिळाल्या बद्दल दिवटे कुटुंबीयांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे

Previous articleअष्टापूरला रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण
Next articleश्रीकृष्ण मंदिरात एक हजार पाचशे एक दिवे लावून दिपोत्सव साजरा