अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट

  गणेश सातव,वाघोली

 पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी आणि पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली.

एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या शिष्टमंडळाने आज दिलीप वळसे पाटील यांची मंचर येथे भेट घेतली.शिष्टमंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर आणि परिषदेचे माजी विभागीय सचिव डी. के. वळसे पाटील यांचा समावेश होता.

 

गृहमंत्र्यांशी चर्चा करताना एस. एम.देशमुख यांनी राज्यात पुन्हा पत्रकारांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितले. गेल्या दोन दिवसात मुंबई, चाकुर, श्रीगोंदा आदि ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.या प्रकरणातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एस.एम.देशमुख यांनी यावेळी केली.

राज्यात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची कोंडी करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.सत्य बातमी दिल्यामुळे केज येथील पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचे देशमुख यांनी वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासून पहावी अशी मागणी देखील शिष्टमंडळाने भेटीत केली. वरील मागण्यांसंदर्भात वळसे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

पत्रकारांचे पेन्शन आणि अन्य प्रश्न प्रलंबित आहेत.पत्रकारांना कोरोना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे आणि ज्या १५५ पत्रकारांचे कोरोनानं निधन झालं आहे अशा सर्व पत्रकारांच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांचे अनुदान द्यावे आदि मागण्या सातत्यानं सरकारकडे केल्या जात आहेत.परंतू या संबंधी कोणताच निर्णय होत नसल्याने आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी अशी विनंती वळसे पाटील यांच्याकडे केली असता मुख्यमंत्र्यांशी बोलून अशी बैठक लावण्याचे आश्वासन गृहमंत्री महोदयांनी शिष्टमंडळास दिले आहे.

Previous articleहवेली प्रांतसाठी जोरदार फिल्डींग,पद एकच मात्र इच्छूक अनेक असल्याने ‘पेटी’ तला भाव खोक्यात
Next articleमहिलांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन