राजगुरूनगरच्या गिर्यारोहकांनी कमळगडावर फडकाविला तिरंगा

राजगुरूनगर- २९ ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाबळेश्वर डोंगर रांगेतील उत्तुंग दुर्ग असणारा कमळगड(उंची ४२०० फूट) सर करीत, रोहित जाधव, शिवाजी जाधव, अथर्व शेटे आणि डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी अभिमानाने तिरंगा फडकावित, भारतीय हॉकीचे मानांकित खेळाडू मेजर ध्यानचंद यांना सलाम करीत केलेली ही मोहीम भारतीय खेळाडूंना समर्पित केली.

या मोहिमेची सुरवात नांदगणे (ता.वाई, जि.सातारा ) येथून झाली. गडावर जाणारी पाऊलवाट ही दाट जंगलातील आहे. खड्या चढाईची निसारडी आणि चिखलमय पाऊलवाट ही दमछाक करणारी आहे. तब्बल दोन तासांची पायपीट केल्यावर प्राचीन गोरक्षनाथांचे मंदिर आहे. या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढे वीस मिनिटांची पायपीट आपल्याला कमळ माची वर घेऊन जाते. या ठिकाणी थोडे तटबंदीचे अवशेषही आढळतात.

कमळ माची हुन पुढे अर्ध्या तासांची दाट जंगलातील खड्या चढाईचा दमछाक करणारा मार्ग आपल्याला गड माथ्यावर घेऊन जातो. गड माथ्यावर घेऊन जाणारा शेवटचा १५ फूटी अवघड खडकाळ टप्पा शिडी मुळे सोप्पा होतो.

वरती असणारी कावेची विहीर ही एकमेव अद्वितीय पुरातन वस्तू असल्याने या गडाचे मुख्य आकर्षण आहे. या ठिकाणी जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायर्‍याही आहेत. हिला गेरूची किंवा कावेची विहीर म्हणतात. या ५० – ५५ खोलखोल पायर्‍या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.

अखेर चहु बाजूंनी असलेले घनदाट जंगल, शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा खड्या चढाईचा दमछाक करणारा मार्ग, निसारडी आणि चिखलमय पाऊलवाट, धुक्यात हरवलेला परिसर, अश्या अनेक आव्हानांना सामोरे जात रोहित जाधव, शिवाजी जाधव, अथर्व शेटे आणि डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी गडाचा माथा गाठत अभिमानाने तिरंगा फडकावित, हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना सलाम करीत, केलेली ही मोहीम भारतीय खेळाडूंना समर्पित केली.

Previous articleऐतिहासिक बोल्हाईमाता मंदिर परिसरातीत युवकांनी केले स्वच्छता व श्रमदान 
Next articleवृक्षारोपणा बरोबरचं ‘प्लॅस्टिकमुक्त’ गाव संकल्पना राबवणे हि काळाची गरज – ह.भ.प शिवाजी महाराज मोरे