वाघोलीतील झोपडपट्टी धारकांचे एसआरए योजनेअंतर्गत पुनर्वसन होणार- आमदार अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

वाघोली येथील झोपडपट्टी धारकांचे योग्य पुनर्वसन लवकरात लवकर करण्यासाठी पीएमआरडीए व पुणे महापालिकेच्या वतीने वाघोलीत एस.आर.ए. योजना लवकरात लवकर राबवण्याचा प्रयत्न असून त्यासाठी येत्या सोमवारी (ता. ९) वाघोलीत संबंधित अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती शिरूर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी दिली. वाघोलीत झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी पुणे महापालिकेत शुक्रवारी आमदार अशोक पवार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्यासमवेत बैठक घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी वाघोलीतील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी चर्चा करण्यात आली.

वाघोलीतील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन प्रश्नी गेली दोन वर्षे शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.सध्या वाघोलीचा समावेश पुणे महापालिकेत झाल्यामुळे एसआरए योजनेच्या माध्यमातून हा प्रश्न अधिक लवकर सोडवता येणे शक्‍य झाले आहे.
पुण्यामध्ये एसआरए योजनेअंतर्गत झालेल्या इमारतीसारख्या दर्जेदार योजना वाघोलीत राबवत झोपडपट्टीधारकांना सर्व सुविधांनी युक्त फ्लॅट देण्याचे तसेच झोपडपट्टी धारकांचे जीवनमान उंचावण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.यामध्ये तरूणांना उच्च शिक्षणाच्या संधी, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती यासाठी वेगवेगळे तज्ञ नेमणे तसेच नागरीकांचे प्रबोधन करणे यावर भर देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत बांधावयाच्या इमारती या दर्जेदार तसेच सर्व सुख सुविधांनी युक्त असणार आहेत. पुण्यात आतापर्यंत एसआरए योजना अंतर्गत झालेले सर्व प्रकल्प अतिशय दर्जेदार झाले असून तेथील पुनर्वसित लाभधारकही समाधानी आहेत. एकूणच एसआरए योजनेसारख्या दर्जेदार योजनेद्वारे झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करत असतानाच वाघोलीचाही सर्व सुविधांनी पूर्णपणे कायापालट करण्याचा मानस असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

Previous articleपूरग्रस्त जोर जांभळी खोऱ्यात मराठी पत्रकार परिषद धावली
Next articleजोर जांभळीतील पूरग्रस्तांना मराठी पत्रकार परिषदेचा मदतीचा हात