झाडांना राख्या बांधून साजरे करण्यात आले वृक्ष रक्षाबंधन

नारायणगाव, किरण वाजगे

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वारूळवाडी (ता.जुन्नर) येथे झाडांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे निसर्ग आणि पर्यावरण यांचा थेट संबंध आपल्या जीवनशैलीशी आहे. खरंतर, झाडे म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान आणि बहुमोल अशी भेटचं आहे. शिवाय, झाडे म्हणजे आपल्या जीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहेत. झाडे आपल्या आयुष्यात इतकी महत्वाची आहेत की त्यांच्याशिवाय आयुष्य जगण्याची कुणीही कल्पना सुद्धा करू शकत नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे झाडे आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देतात. झाडांचे आपण रक्षण केले तरच झाडे आपले रक्षण करतील.असे प्रतिपादन वारूळवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख माधुरी शेलार यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी वारुळवाडी गावाचे प्रथम नागरिक-सरपंच राजेंद्र मेहेर ,ग्रा.प.सदस्य जंगलभाऊ कोल्हे,तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवदत्त-मामा संते,ग्रामविकास अधिकारी सतिश गवारी, श्रीकांत आल्हाट,विशेष शिक्षिका संगिता डोंगरे,शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा डोंगरे ,विद्यार्थी,शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

वारूळवाडी गावचे सरपंच राजेंद्र मेहेर म्हणाले की, वन ट्री चॅलेन्ज ही संकल्पना सर्व नागरिकांनी जरूर राबवावी.पर्यावरणाची कशी हाणी होत आहे, याबद्दल पुस्तकेच्या पुस्तके लिहिली गेली आहेत, माहितीपट बनले आहेत, आंदोलने झाली आहेत… पण जोपर्यंत प्रत्येक माणसाला हा विषय आपला वाटत नाहीत. तोपर्यंत जगभरातील सत्ताधीशांना याचे महत्त्व पटणार नाही. त्यासाठी ‘वन ट्री चॅलेन्ज’! म्हणजे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक तरी झाड लावून त्याचे मोठे होई पर्यंत संवर्धन करावे. आपल्यातील प्रत्येकाला ‘वन ट्री चॅलेन्ज’ स्वीकारावेच लागेल.यासाठी प्रत्येक मुलाने तयार केलेले सीड बॉल मोकळ्या जागी योग्य प्रकारे खड्डा घेऊन लावावेत.

शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आणि शाळेतील शिक्षिका यांनी झाडांचे महत्त्व विषद केले. आपण सर्वांनी शाळेत असल्यापासून “झाडे लावा, झाडे जगवा” हा सुविचार अनेक वेळा ऐकला आहे. झाडे आपल्या जीवनाचा सार आहेत. झाडांशिवाय पृथ्वीवरील सजीवसृष्टीची कल्पना करणे देखील व्यर्थ ठरेल. जिथे शक्य असेल तिथेतिथे वड, पिंपळ, चिंच, जांभूळ असे वृक्ष लावायला हवेत आणि जगवायला हवेत. आपण लावलेली ही झाडे भविष्यात इतर संकटाशी सामना करण्याची नवी उमेद देतात .सर्व वनस्पती या पृथ्वीवरील अमूल्य ठेवा आहेत. शिवाय, वृक्षांमुळेच माणसाला त्याच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यावश्यक असलेली संसाधने प्राप्त होतात. जर झाडे नसतील तर पर्यावरणाचा सगळा समतोल बिघडेल.जर झाडे तोडण्यासोबतच मानवाने नवीन रोपांची लागवड केली नाही तर, आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टी संकटात येईल . कित्येक शतकानुशतके झाडे सजीवांच्या जीवनाचा अविभाज्य असा भाग आहेत.जगाची तापमानवाढ रोखायची असेल तर कार्बन डायऑक्साइचे उत्सर्जन कमी करायला हवे. कार्बन शोषून घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा करणारे झाड नावाचं एक नैसर्गिक यंत्र आपल्याकडे आहे. अगदी प्राचीन काळाच्या पाषाण युगापासून ते आजच्या विज्ञान युगापर्यंत सर्व जीव हे वनस्पतींवर अवलंबून आहेत. पृथ्वीवर पावसाचे आगमन सजीवसृष्टीला ऑक्सिजन झाडांमुळे मिळते. प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे आपल्याला खूप उपयुक्त ठरतात.म्हणून आपण झाडांचे आपण रक्षण केले तर झाडे आपले रक्षण करतील.झाडे कधीच न तोडण्याची व वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेण्याची प्रतिज्ञा मुलांना घेतली आली.

कार्यक्रमाची व्यवस्था स्वाती शिंदे , वैशाली वामन ,प्रतिमा नलावडे,अनिता साबळे यांनी केली.
प्रास्ताविकातून संपूर्ण कार्यक्रमाची माहिती मुख्याध्यापिका शोभा डोंगरे यांनी दिली.

Previous articleसंतुलन संस्थेत संविधानास राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा
Next articleदेशाला स्वातंत्र्य मिळवण्यात आदिवासींचे योगदान- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी