संतुलन संस्थेत संविधानास राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा

गणेश‌,सातव – वाघोली

रक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावास राखी बांधून आयुष्यभर स्वतःचे रक्षण करण्यासाठी भावाकडून घेतलेली हमी.परंतु खऱ्या अर्थाने या भारत देशाचे संविधान हाच आपला रक्षण करता मोठा भाऊ असून त्याचे पूजन करून आणि त्याला राखी बांधून वंचितांच्या न्याय हक्कासाठी रचनात्मक पद्धतीने पंचवीस वर्ष संघर्ष करणाऱ्या संतुलन संस्थेमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

संविधानाचे पूजन व औक्षण करून त्यास राखी बांधून महिला भगिनी व विद्यार्थ्यांनी स्वतः बरोबर देश रक्षणासाठी प्रार्थना केली. “बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी, राखी बांधून संविधानास देश संविधानाच्या हाती” म्हणत उत्सव साजरा केला.

महिलांनी पारंपारिक पद्धतीबरोबरच आजच्या आधुनिक पद्धतीने देश सेवेची जबाबदारी ओळखून आपले कार्य करावे, तसेच या वर्षी अमृत महोत्सव साजरा करतांना हर घर तिरंगा बरोबरच हर घर संविधान सुद्धा महत्वाचे आहे असे विचार संतुलन संस्थेचे संस्थापक अँड.बी.एम.रेगे यांनी मांडले. त्याच्या संकल्पनेतून आणि संचालिका अँड. पल्लवी रेगे यांच्या मार्गदर्शनातून दगडखाण आणि कष्टकरी कामगारांच्या शुभहस्ते खराडी येथील तुळजाभवानी नगर येथे संतुलन भवन मध्ये साजरा करण्यात आला.

या प्रसंगी दगडखाण कामगार परिषदेचे पदाधिकारी,संतुलन पतसंस्था,संतुलन महिला कष्टकरी परिषद, संतुलन पाषाण शाळा शिक्षक वृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ चांदणे यांनी तर आभार अँड. पल्लवी रेगे यांनी मानले.

Previous articleनारायणगाव पोलिस स्थानकात रोटरी क्लबच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम
Next articleझाडांना राख्या बांधून साजरे करण्यात आले वृक्ष रक्षाबंधन