केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही- शरद पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन—प्रतिनिधी

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही असे सांगतानाच आता उद्योगधंदा कसा सुरू होईल याकडे लक्ष द्यायला हवे. जसा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसाच राज्याचा आर्थिक प्रश्नही महत्त्वाचा असून राज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा पालकमंत्री सुभाष देसाई व आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी आढावा घेतला.

कोरोना संकटावर मात करायची तर सर्वांनी एकत्र लढले पाहिजे. देशातील साधारण पाच-सहा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद या भागातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे असेही शरद पवार म्हणाले.
कोरोना लॉकडाऊन काळात स्थानिक लोकांनी अनेक सण साधेपणाने साजरे करून सर्व समाजाला एक उत्तम उदाहरण दिले आहे. प्रादुर्भावाचा डबलिंग रेट हा १४ दिवसावरून ३० दिवसावर जाणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे इथली परिस्थिती सुधारण्यासाठी स्थानिकांची नक्कीच मदत मिळेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी इतकेच नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही यात जबाबदारीने लक्ष घातले आहे. मात्र लोकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ज्या सूचना सरकार करत आहे त्याचे काटेकोर पालन जनतेकडून होताना दिसत आहे अशा शब्दात जनतेचे कौतुकही शरद पवार यांनी केले.

खासगी डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझॅस्टर मॅनेजमेंट कायदा आहे त्यातील अधिकारांचा वापर करून खासगी डॉक्टरांना समन्स पाठवण्याचा विचार करावा लागेल अशी शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली.
मालेगाव, धारावीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. जे सहकार्य तिथल्या लोकांनी केले तसेच सहकार्य औरंगाबाद शहरातील जनताही करेल आणि संकटावर मात करेल अशी खात्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

Previous articleजुन्नर तालुक्यात कोरोना बळींची संख्या झाली १३ तर एकूण ३७० पॉझिटिव्ह रुग्ण
Next articleकोरोनावर मात करत घरी परतलेल्या खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्यावर फुलांचा वर्षाव करत केले स्वागत