जुन्नर तालुक्यात कोरोना बळींची संख्या झाली १३ तर एकूण ३७० पॉझिटिव्ह रुग्ण

येडगाव व नगदवाडी येथील दोन वृद्धांचा कोरोना व इतर आजारामुळे मृत्यू

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज सकाळपर्यंत ११ तर सायंकाळी पाच वाजता १५ असे एकूण आज २६ रूग्ण कोरोणा  पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील ८० वर्षीय वृद्धाचे कोरोनामुळे आज दि. २५ रोजी सकाळी निधन झाले आहे. तर नगदवाडी (कांदळी) येथील एका ६२ वर्षाच्या वृद्धाचा कोरोना सदृश्य आजारामुळे आज मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

या घटनेबरोबर आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये कोरोनामुळे  मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एकूण तेरा एवढी झाली आहे.

जुन्नर तालुक्यात आज अखेर कोरोना पॉझिटिव्ह असलेले एकूण रुग्ण ३७० एवढे झाले असून आजपर्यंत १६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १९४ रूग्ण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी हेमंत गरिबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे यांनी दिली.

दरम्यान जुन्नर मध्ये आज चार रुग्ण, हिवरे बुद्रुक येथे तीन, ओतूर येथे सात, वैष्णवधाम येथे तीन, नारायणगाव येथे दोन, गुळुंचवाडी येथे दोन तसेच आगर, कुरण, बारव, बेल्हे व गोळेगाव येथे प्रत्येकी एक असे एकूण तालुक्यामध्ये आज सव्वीस रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोना बाबत प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून सर्वांनी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावे, अशी सूचना वारंवार प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे त्यामुळे सर्वांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून कोरोना मुक्त जुन्नर तालुका होईल या दृष्टीने वाटचाल करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.

Previous articleदौंड तालुक्यात ग्रामीण भागात आज कोरोना चे पाच रुग्ण
Next articleकेंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली दिसत नाही- शरद पवार