धनगरवाडीत बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यु

नारायणगाव (किरण वाजगे)

बिबट्याची मादी विहिरीत पडून मृत झाल्याची घटना नुकतीच जुन्नर तालुक्यात घडली आहे.

धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील रमेश दगडू शेळके यांच्या शिवारातील विहिरीत मंगळवार दि. २७ एप्रिल रोजी रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या सावजाचा पाठलाग करीत असताना विहीरीत पडून मृत्युमुखी पडला.

रमेश शेळके बूधवारी सकाळी १० वाजता विद्यूत पंप सुरू करण्यासाठी विहीरीवर गेले असता एका प्लँस्टीकच्या गोणीमध्ये एक बिबट्या पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी ताबडतोब धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके यांना फोन करून त्याची माहिती दिली. महेश शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली.

दरम्यान स्थानिक तरूणांच्या मदतीने ह्या बिबट्याला बाहेर काढण्यात आले. वनपाल एम. जे. काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर या बिबट्यास माणिकडोह बिबट निवारा केंद्रात शवविच्छेदन व अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात आले. भक्ष्याचा पाठलाग करीत असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज वनपाल एम. जे. काळे यांनी व्यक्त केला आहे. हा बिबट्या मादी वर्गातला असून साधारणतः एक वर्षाचा आहे असे काळे यांनी सांगितले.
सर्वत्र शेतशिवारात अनेक ठिकाणच्या विहीरींना कठडे नसल्याने विहीरीत पडून बिबटे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

Previous articleउरुळी कांचन – प्राथमिक आरोग्य केंंद्रात शव विच्छेदनाला मंजूरी
Next articleकोरोनाला हद्दपार करुया घरी रहा.. सुरक्षित रहा आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने