उरुळी कांचन – प्राथमिक आरोग्य केंंद्रात शव विच्छेदनाला मंजूरी

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन (ता.हवेली) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत होणार शव विच्छेदन केंद्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची व स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याची माहिती सरपंच संतोष कांचन व जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी दिली. उरुळी कांचन हे पुणे सोलापूर महामार्गावरील सुमारे एक लाखाच्यावर लोकसंख्या असणारे उपनगर आहे. महामार्गावरील उपनगर असल्याने वर्दळीच्या वाहतुकीत अपघातांचे प्रमाण नेहमीच मोठे असते.

या अपघातात दगावलेल्या व्यक्तीचे शव विच्छेदन करण्यासाठी एक तर ससूनला किंवा यवत येथील शव विच्छेदन केंद्रात जावे लागते. या प्रकारात मृताचे नातेवाईक, पोलीस यांना नेहमीच मोठ्या दिरंगाईला व पश्चातापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे यवत ते पुण्यातील ससून रुग्णालय यांच्या मध्ये एक शव विच्छेदन केंद्र असावे अशी मागणी पोलीस विभाग, उरुळी कांचन ग्रामपंचायत, पत्रकार, मृतांचे नातेवाईक, रुग्णवाहिका चालक व अन्य संस्था संघटनांची मागणी होती.

याला अनुसरून उरुळी कांचन ग्रामपंचायतीने हवेली पंचायत समितीकडे प्रस्ताव देवून पाठपुरावा केल्यावर त्यांनी प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीकडे पाठवला. त्याला ३० मार्च २०२१ रोजीच्या पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असुन उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीजवळ ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून शव विच्छेदनासाठी लागणारी इमारत बांधून ती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात देवून तेथे शव विच्छेदन केंद्र सुरु केले जाणार असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रशांत शिर्के यांनी दिली.

या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, सदस्या कल्पना जगताप, किर्ती कांचन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन खरात यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायतीला सहकार्य केले आहे. तर जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी पाठपुरावा करून अल्प काळात मंजुरी मिळवली आहे.

Previous articleडॉ.मणिभाई देसाई यांच्या जयंती निमित्त पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मास्क – सॅनिटायझरचे वाटप
Next articleधनगरवाडीत बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यु