शिव संस्कार सृष्टी व पर्यटनाला चालना देणार – खा.डॉ.अमोल कोल्हे

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे- जुन्नर तालुक्यात शिव संस्कार सृष्टी, पर्यटन विकासासाठी महामार्ग मजबूतीकरण, बाह्यवळण रस्ते, पुणे नाशिक रेल्वे, व इतर प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प लवकरच पुर्ण होणार असून जुन्नर तालुका हा पुणे, नाशिक, मुंबई आणि अहमदनगर  या चार मोठ्या शहरांचा  सुवर्ण चतुष्कोण गृहित धरून  ‘पर्यावरण पुरक रहिवासी झोन’  म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे.असे प्रतिपादन खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी केले आहे .

जुन्नर तालुक्यात पर्यटन वाढ होण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना कराव्यात आणि प्रकल्प राबवावेत अशा विविध मागण्या जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडे करण्यात आल्या.

यावेळी झालेल्या बैठकीत खासदार डॉ.कोल्हे नारायणगाव येथील त्यांच्या कार्यालयात बोलत होते. ते पुढे म्हणाले की,जुन्नर तालुक्यात पर्यटन विकासासाठी लवकरच सर्वसमावेशक आराखडा तयार करणार आहोत. जुन्नर पर्यटन विकास संस्थेने केलेल्या सर्व मागण्या तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टीने एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या आहेत. जुन्नर मध्ये पर्यटन वाढीस लागण्याच्या दृष्टीने शिव-संस्कार-सृष्टी आराखडा बनवण्याचं काम चालु आहे, यामध्ये बहुतेक बाबी समाविष्ट करण्यात येतील.

यावेळी जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने मागण्या करण्यात आल्या. यामध्ये तालुक्यातील विविध गावातील पर्यटन स्थळे निश्चित करुन तेथे पार्किंग लॉट करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे ,शौचालय सुविधा उपलब्ध करणे, दिशादर्शक फलक लावणे, माहिती फलक लावणे, जुन्नर पर्यटन नकाशा लावणे, आदिवासी विकास आणि पर्यटन विभागाचे वतीने होम स्टे करणे, लोक कला संवर्धन करण्यासाठी विविध महोत्सव आयोजित करणे, गाईड प्रशिक्षण आयोजित करणे, आदरातिथ्य , कलाकुसर प्रशिक्षण देण्यात यावे. शिवजयंती महोत्सव हा राज्यातील सर्व शिवप्रेमींना आकर्षित करण्यासाठी ७ दिवस आयोजित करुन त्यामध्ये हेरीटेज वाॅक, लोककला  प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, शालेय आणि खुल्या गटांच्या विविध स्पर्धा, स्थानिक बचत गटांचे उत्पादन प्रदर्शन, खाद्य संस्कृती सफर, मॅरेथॉन रन, सायकल स्पर्धा आयोजित  करुन या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत, या मागण्या जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने खासदार डॉ.कोल्हे यांच्याकडे यावेळी करण्यात आल्या.

जुन्नर पर्यटन विकास सदस्यांच्या वतीने पर्यटन जुन्नरचे सन्मानचिन्ह, शिवप्रतीमा देवुन खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हाडवळे, अध्यक्ष यश मस्करे, उपाध्यक्ष प्रा.राधाकृष्ण गायकवाड, सचिव जितेंद्र बीडवई, खजिनदार शिरीष भोर, दत्ता बाळसराफ, सर्पदंश तज्ञ डाॅ.सदानंद राऊत, साहसी  क्रिडा  तज्ज्ञ  जितेंद्र हांडे – देशमुख, अमोल कुटे, शिरीष डुंबरे,पत्रकार अशोक खरात, साहित्यिक संदीप वाघोले उपस्थित होते.

   खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले की, भिमाशंकर ते भंडारदरा हा ट्रेक रुट मी स्वतः पावसाळ्यात करणार आहे. त्यामुळे निसर्ग प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्थानिक गरजू तरुणांना गाईड म्हणून सेवा देता येईल.जुन्नर तालुक्यातील जलाशयांमध्ये  विविध जल क्रिडा प्रकार सुरु करुन पर्यटन विकासासाठी चालना दिली जाईल.तालुक्यातील साहसी पर्यटन विकासासाठी लवकरात लवकर पी.पी.पी.धोरण तयार  करण्यात येणार आहे.”

Previous articleवाहतूक पोलीसांना फराळ वाटप
Next articleरोहकलच्या सरपंचांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला