शिक्षण महर्षी … तात्यासाहेब गुंजाळ यांचे निधन

नारायणगांव (किरण वाजगे

जुन्नर तालुक्याचे भूमीपूत्र तथा शिक्षण महर्षी तसेच सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व महादेव उर्फ तात्यासाहेब रखमाजी गुंजाळ यांचे रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात दोन पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.गेली १९ दिवस तात्यासाहेब गुंजाळ यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.आज अखेर सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जुन्नर तालुक्यातील कुरण येथील माळरानावर शिक्षणाची गंगा उभी करणा-या तात्यासाहेब गुंजाळ यांनी जयहिंद काँम्प्रेहेंसिव एज्युकेशन इंस्टिट्यूट च्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले.

१९९० साली त्यांनी जनता दलाच्या वतीने जुन्नर विधानसभेची निवडणूक लढवली होती. तसेच ते जिल्हा परिषद सदस्य देखील होते.
बेल्हे गावातून नारायणगाव येथे अवघे चाळीस रुपये घेऊन आलेल्या तात्यासाहेब गुंजाळ यांनी स्वतःचे शिक्षण कमी झाले असताना देखील आपल्या कर्तुत्वाने शून्यातून विश्व निर्माण केले आहे. जयहिंद काँम्प्रेहेंसिव एज्युकेशन इंस्टिट्यूट या संस्थेचे संस्थापक म्हणून त्यांचा नावलौकिक अवघ्या पश्चिम महाराष्ट्रात नावारूपाला आला आहे.

जनता दलाचे ज्येष्ठ नेते संभाजीराव काकडे तसेच माजी खासदार किसनराव बाणखेले, अ. दत्त चिंतामणी यांचे ते विश्वासू सहकारी होते. तर जनता दलाचे मा. राज्य अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांचे स्नेही होते.

लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे काही काळ ते अध्यक्ष होते. दरवर्षी तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीला तात्यासाहेब गुंजाळ हे काही वर्ष ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष स्वर्गिय बिंदूमाधव जोशी यांच्या सोबत किल्ले शिवनेरी गडावर आवर्जून उपस्थित राहत असे. नारायणगाव येथील पूर्व वेशीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात तात्यासाहेब गुंजाळ यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी स्थापन केलेल्या विविध शैक्षणिक संस्था तसेच आपल्या उद्योग व्यवसायामधून त्यांनी अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच त्यांना शिवनेरी भूषण पुरस्कार देखील देण्यात आला आहे.

१६ जून २०१९ रोजी राजुरी येथील शरदचंद्र पतसंस्थेने तात्यासाहेब गुंजाळ यांना ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते शरदचंद्र गौरव पुरस्कार देऊन गौरवले होते. त्याचप्रमाणे शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या तात्यासाहेबांना जुन्नर तालुक्याचा सर्वोत्कृष्ट शिवनेर भूषण हा पुरस्कार देखील देण्यात आला

तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते व दैनिक सामना चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत तसेच ज्येष्ठ उद्योगपती बाजीरावशेठ दांगट यांच्या हस्ते तात्यासाहेब गुंजाळ यांना गौरविण्यात आले होते.

तात्यासाहेब गुंजाळ यांच्या निधनामुळे जुन्नर तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे.

शब्दांकन – किरण ल. वाजगे
Kiran L. Wajage…✍?

Previous articleशिंदवणे – वळती परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने उरुळी कांचनच्या ओढ्यांना पूर
Next articleआशा गटप्रवर्तक यांच्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – खासदार डॉ अमोल कोल्हे