विक्रांत पतसंस्थेची अल्पावधीत गरुड झेप – संतोषनाना खैरे

नारायणगाव :- (किरण वाजगे)

अवघ्या सात वर्षात विक्रांत पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रामध्ये अल्पावधीत घेतलेली गरुड झेप निश्चित प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे यांनी केले. विक्रांत पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या ७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

नारायणगाव येथील विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेकडे २५ कोटी ३३ लाख रुपयांच्या ठेवी झाल्या असून पतसंस्थेला ३४ लाख रू इतका नफा झाला आहे. वर्षभरात पतसंस्थेच्या ठेवीमध्ये ४ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे. सभासदांना ८ टक्के लाभांश वाटप करण्यास मान्यता देण्यात आली अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संतोष जयवंतराव वाजगे यांनी दिली.

पतसंस्थेची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम मंगल कार्यालय नारायणगाव येथे संस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. याप्रसंगी नारायणगावचे माजी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे उपस्थित होते.

यावेळी बोलताना जुन्नर तालुक्यात सहकारी पतसंस्था अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज करत असून यामध्ये विक्रांत पतसंस्थेने अल्पावधीतच आर्थिक व सामाजिक क्षेत्रात आपले भरीव योगदान दिले आहे.तसेच विक्रांत पतसंस्था ही सहकारात नवीन असूनही सामाजिक क्षेत्रात त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. याचाच आदर्श तालुक्यातील इतर पतसंस्थांनीही घ्यावा असे प्रतिपादन अमित बेनके यांनी केले.

याप्रसंगी माजी सरपंच योगेश पाटे यांनी आवाहन केले की, नारायणगाव मधील सर्व पतसंस्थांनी एकत्र येऊन वैद्यकीय सेवेसाठी अद्यावत सुविधायुक्त असे मोठे हॉस्पिटल उभारावे. जेणेकरून गरीब सर्वसामान्य लोकांना अल्पदरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत संस्थेचे सभासद अनिल दिवटे, हितेश को-हाळे, ललित वाणी विकास बाळसराफ, तेजस वाजगे, सुरज वाजगे, मेहबूब काझी, अशोकशेठ गांधी, सचिन घोडेकर तसेच इतर सभासदांनी सहभाग घेतला. वार्षिक सभेचे सूत्रसंचालन संचालक अजित वाजगे यांनी केले. प्रास्ताविक मुकेश वाजगे यांनी केले तसेच मागील सभेचा वृत्तांताचे वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल शिंदे यांनी केले तर विषय पत्रिकेचे वाचन सचिव निलेश गोरडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष सुजित खैरे यांनी केले.

Previous articleमहाळुंगे पडवळ येथे पारंपरिक बैलपोळा सण उत्साहात साजरा
Next articleपुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने अनेक सामाजिक स्तुत्य उपक्रमानी संपन्न