कृषी पंपाच्या केबलची चोरी करणाऱ्या दोन जणांना अटक

नारायणगाव : (किरण वाजगे)

नारायणगाव व जुन्नर परिसरात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४ लाख ३० हजार ८४० रुपये किमतीची अंदाजे १०० किलो तांब्याच्या धातूची केबल व चार चाकी टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

२४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे जुन्नर विभागात पेट्रोलिंग सुरू असताना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो कृषी पंपाच्या केबल घेऊन चालला असल्याची माहिती मिळाली. नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावर सिनेमा स्टाईल पाठलाग करून हा टेम्पो ताब्यात घेण्यात आला विशाल सुखदेव चव्हाण (वय २५) सुरेश मारुती पंच (वय ३८, दोघेही राहणार पंचलिंग वस्ती, जुन्नर) यांच्याकडील टेम्पोतील माला विषयी कसून चौकशी केली असता त्या दोघांनी या केबल मांजरवाडी, नारायणगाव तसेच येणेरे व जुन्नर येथून मागील काही महिन्यात चोरी केल्याचे सांगितले.

याबरोबरच त्यांच्या जवळ असलेल्या टेम्पोमध्ये लहान मोठ्या जळालेल्या स्थितीतल्या सुमारे १०० किलोच्या वजनाच्या तांब्याच्या तारा आढळून आल्या.
याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, होमगार्ड आकाशखंडे यांनी ही यशस्वी कामगिरी केली.

Previous articleअंगणवाडी सेविकांच्या मागण्या बाबत सरकार सकारात्मक : अदिती तटकरे यांचे आश्वासन
Next articleआंबेगाव- शिरूर साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत रु. ५.०० कोटी निधी मंजूर – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील