नारायणगाव बाह्यवळण मार्गावरील खोडदरोड चौकात शिवशाही बसला अपघात

नारायणगाव :- (किरण वाजगे)

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावर खोडदरोड चौकात शिवशाही बस ला आज सकाळी अपघात झाला. दुचाकीस्वार आडवा गेल्याने लेन सोडून व दुभाजक ओलांडून ही बस विरुद्ध दिशेने गेल्याने बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले.

दुचाकीस्वार साई सोपान पाटे (वय १९, राहणार, नारायणगाव) हा युवक देखील जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात झाल्यावर नारायणगाव पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी बसमधील जखमींना बाहेर काढले. अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.

दरम्यान ही बस पुण्यावरून नाशिक ला निघाली होती. बस लेन तोडून विरोधी बाजूला गेल्याने धडकली. त्यामुळे बसचे दरवाजे लॉक झाल्याने सर्व प्रवाश्यांना पुढची काच तोडून पीक अप च्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.दरम्यान बसमधील जखमींना जवळच्या रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे.

खोडद चौकात सातत्याने येथे अपघात घडत असतात या ठिकाणी भुयारी रस्ता मंजूर झाला असल्याचे प्रशासनाकडून बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्षात काम कधी होणार असा सवाल खोडद व हिवरे येथील ग्रामस्थांनी केला आहे.

Previous articleगावरवाडी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न
Next articleभारतीय सेना दलाच्या वतीने ७५ गडकिल्ल्यांवर फडकावला तिरंगा