शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त ‌‘विठू माऊली माझी’ कार्यक्रम

उरुळी कांचन

‘अबीर गुलाल’, ‌‘कोटी कोटी रूपे तुझी’, ‌‘माझे माहेर पंढरी’, ‌‘कानडा राजा पंढरीचा’, ‌‘अवघे गरजे पंढरपूर’ या आणि इतर भक्तिरचनांमध्ये तल्लीन होत आज विठ्ठलाचा धावा केला. निमित्त होते ते शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‌‘विठू माऊली माझी’ या अभंगवाणी कार्यक्रमाचे. पावसाच्या सुखद धारा आणि भावभक्तीचा फुललेला मळा असा सुखद सोहळा या निमित्ताने अनुभवायला मिळाला.
बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीचे निमित्त साधून शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाचे यंदाचे २४वे वर्ष आहे.

‘आधी वंदिला वरद विनायक’, ‌‘पांडुरंग कांती’, ‌‘ये जवळी घे जवळी’, ‌‘अनंता तुला कोण’, ‌‘रुणूझुणू रुणूझुणू रे’, ‌‘रंगा येई वो’, ‌‘भजन चालले उफराटे’, ‌‘विष्णुमय जग’, ‌‘श्रीरामचंद्र कृपाळू’, ‌‘कंकड चुन चुन महल बनाया’, ‌‘संतभार पंढरीत’, ‌‘घनु वाजे घुनघुना’, ‌‘नको देवराया’, ‌‘अरे अरे ज्ञाना झालासी’ या रचना सादर करण्यात आल्या. मयूर महाजन, मेघना सहस्त्रबुद्धे-खंडकर, सचिन इंगळे या गायक कलाकारांनी रचना सादर केल्या तर अमृता ठाकूरदेसाई, निलेश देशपांडे, राजेंद्र दूरकर, केदार मोरे, सोमनाथ साळुंके यांनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांचे निवेदन होते. आषाढी वारीनिमित्त सगळ्यांनाच पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी पोहोचणे शक्य होत नाही. अशा वेळी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती दिली आहे. या भक्तीगीतांमुळे जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयात, मनात पांडुरंगाचा वास निर्माण झाला आहे, असे गौरवोद्गार डॉ. दिलीप भुजबळ (आयजी, सीआडी) यांनी काढले.

पुणेकरांसाठी २४ वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. पुणेकरांचा या उपक्रमास दरवर्षी भरभरून प्रतिसाद मिळत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, असे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया प्रास्ताविकात सांगितले.
आषाढी निमित्त हा योग जुळून आल्याने कार्यक्रम ऐकून प्रसन्न वाटत आहे, अशा भावना पुण्यातील रसिक जयराज व्होरा यांनी व्यक्त केली.

Previous articleउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बाल कल्याण मंत्री लोढा यांचा अंगणवाडी सेविकांकडून सत्कार तसेच महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या वतीने ऊर्जा मंत्री यांना दिले निवेदन
Next articleआषाढी वारीच्या निमित्ताने वडजाई जिल्हा परिषद शाळेत “विठ्ठल नामाची शाळा भरली”.