आषाढी एकादशीच्या दिवशी नारायणगावात कुर्बानी नाही : मुस्लिम बांधवांचा स्वागतार्ह निर्णय

किरण वाजगे,नारायणगाव

आषाढी एकादशी व बकरी ईद योगायोगाने एकाच दिवशी आल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावनांचा विचार करत नारायणगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीतील गावांमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने बकरी ईद निमित्त कोणत्याही जनावरांची कुर्बानी देणार नसल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने नारायणगाव पोलीस स्थानकात जाहीर करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
नारायणगाव पोलीस स्थानकात मंगळवार दिनांक २७ रोजी सायंकाळी झालेल्या बैठकीत बकरी ईदच्या दिवशी कोणत्याच जनावरांची कुर्बानी देण्यात येणार नसल्याचे यावेळी मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

याप्रसंगी शाही जामा मस्जिदचे अध्यक्ष हाजीभाई कुरेशी, येडगाव मुस्लिम समाजाचे विश्वस्त हाजी बशीर भाई मोमीन, वडगाव कांदळी मुस्लिम समाजाचे व मंगरूळ पारगाव मुस्लिम समाजाचे विश्वस्त, तसेच नारायणगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सर्व खाटीक समाजाचे प्रतिनिधी, चिकन मटन विक्रेते उपस्थित होते.

उपस्थित मुस्लिम बांधवांना सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मेहबूब काझी सर यांनी केले सूत्रसंचालन जुबेर शेख यांनी तर सलीम मोमीन यांनी आभार मानले.

Previous articleभटकळवाडी लेंडेमळा येथे शेताच्या बांधावर बिबट्याचा ठिय्या
Next articleजमीन सुपीकता जागृती दिन उत्साहात साजरा