भटकळवाडी लेंडेमळा येथे शेताच्या बांधावर बिबट्याचा ठिय्या

नारायणगाव : – (किरण वाजगे)

पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील भटकळवाडी लेंडेमळा शिवारात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. रात्रीच्या वेळी शेताला पाणी भरण्यासाठी जाणे शेतकऱ्यांना जिकरीचे झाले आहे. येथील पाळीव प्राण्यांवर सातत्याने होणारे बिबट्याचे हल्ले व त्याच्या वास्तव्यामुळे या भागात बिबट्याची मोठी दहशत आहे.
येथील मनोहर लेंडे व उमेश लेंडे यांच्या ऊसाच्या शेताच्या बांधावर एक बिबट्या ठाण मांडून बसला होता.

सोमवारी (दि. २६ ) रोजी मध्यरात्री येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन राम लेंडे हे आपले हॉटेल बंद करून घरी येत असताना त्यांना हा बिबट्या बराच वेळ तेथे बसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये या बिबट्याचे चित्रीकरण केले. बराच वेळ आपल्या गाडीचा हॉर्न वाजवला तरी हा बिबट्या त्या बांधावरून काही उठत नव्हता. या भागात सातत्याने बिबट्याचा वावर असून येथील अनेक पाळीव जनावरे तसेच पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.

या भागात मोठ्या प्रमाणावर असलेल्या बिबट्याचा वावर लक्षात घेता येथे त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक शेतकरी रोहिदास लेंडे, विजय लेंडे, नितीन लेंडे, युवराज लेंडे, शिवाजीलेंडे उत्तम लेंडे अशोक लेंडे दत्ता लेंडे, विजय निकम, नामदेव लेंडे, दत्तोबा लेंडे, बाळासाहेब लेंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास लेंडे व नितीन लेंडे यांनी केली आहे.

Previous articleकुरकुंभ ब्रिज खाली ५५वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Next articleआषाढी एकादशीच्या दिवशी नारायणगावात कुर्बानी नाही : मुस्लिम बांधवांचा स्वागतार्ह निर्णय