जुन्नरच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

नारायणगाव :- (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पंचायत समितीचे विषयतज्ञ रवींद्र तोरणे म्हणाले की, जुन्नर तालुक्याला ३१ मे रोजी पाठ्यपुस्तके प्राप्त झाली. पाठ्यपुस्तक वाटपाचे सूक्ष्म नियोजन करून सहा ६ ते १२ जून या कालावधीत तालुक्यात असणाऱ्या ३३ केंद्रांना जुन्नर येथून पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले.

केंद्रप्रमुखांमार्फत ४१४ शाळांना ही पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. सदरची पाठ्यपुस्तके ही सन २०२१ – २२ च्या यु-डायस पटावर असणाऱ्या विद्यार्थी संख्या एवढी आहेत. १५जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार असल्याने शाळेच्या शैक्षणिक नियोजनात सुसूत्रता येण्यास निश्चित मदत होणार आहे. सर्व शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. तालुक्यातील सर्व शाळांनी याबाबत अतिशय चांगली तयारी केली असून उत्साही व आनंदी वातावरणामध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

वारूळवाडी केंद्रात देखील विस्तार अधिकारी माधुरी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. या कामी शोभा डोंगरे, रियाज मोमीन, शांताराम डोंगरे, महादेव खैरे, सुनिता गायकवाड, सुनिता डुंबरे, प्रतिभा अडसरे, प्रतिमा नलावडे या शिक्षकांनी योगदान दिले. शाळेचा एकही दाखल पात्र विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाही याबाबत विशेष दक्षता घेण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी केले आहे. १५ जून रोजी शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात होणार असल्याने या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून अधिकाऱ्यांच्या विशेष भेटीचे नियोजन करण्यात आले आहे.

Previous articleगगनझेप प्रतिष्ठान सामाजिक संस्थे मार्फत प्रमाणपत्र वाटप
Next articleनव्या शैक्षणिक वर्षात जि.प.शाळा वडजाई येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत