टेम्पो ट्रॅव्हलर व मोटारसायकल अपघातात तीन जण ठार

नारायणगाव : (किरण वाजगे)

नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद गावच्या शिवारात चौगुलेनामे वस्तीजवळ बुधवार (दि. ०७ ) रोजी रात्री अकराच्या सुमारास मोटारसायकल व टेम्पो ट्रॅव्हलर बस यांच्यात धडक होऊन मोटारसायकलवरील तिघेजण ठार झाले असल्याची घटना घडली आहे.

तिघेही परप्रांतीय मजूर असून आळेफाटा येथे एका खाजगी बेकरीत ते कामाला होते. या अपघातातील मृतांची नावे योगेश रामकुमार (वय २१), चाहात बाबुराव (वय-१७) आणि संजीव कुमार (वय २४, सर्व राहणार उत्तरप्रदेश) अशी आहेत.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आळेफाटा येथे असलेल्या एका खाजगी बेकरीत काम करणारे हे मजूर बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले असता सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर बसने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागेवरच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा तपास आळेफाटा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Previous articleआडनावाप्रमाणे “घोटाळे’ करून दोन दोन नवऱ्यांची फसवणूक : “घोटाळे”बाज नवरीसह सहा जणांच्या टोळक्याला अटक
Next articleकामगार कायद्यातील तरतूदीचा भंग करणाऱ्या महावितरण कंपनी प्रशासनासह कंत्राटदारवर कारवाईचे आदेश