आडनावाप्रमाणे “घोटाळे’ करून दोन दोन नवऱ्यांची फसवणूक : “घोटाळे”बाज नवरीसह सहा जणांच्या टोळक्याला अटक

नारायणगाव (किरण वाजगे)

जिचे आडनावच ‘घोटाळे’ आहे अशा नवरीसह सहा जणांच्या टोळक्याला एकाच मुली बरोबर अनेकांची लग्न लावल्याप्रकरणी अटक करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.

खोडद व गुंजाळवाडी (आर्वी) येथील शेतकरी कुटुंबातील दोन युवकांबरोबर दीड महिन्यात एकाच मुलीचा विवाह लावून दागिने व रोख रक्कम मिळून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केलेल्या टोळीतील जयश्री बाळू घोटाळे (वय ३५ राहणार मुरंबी, शिरजगाव ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक) हिच्यासह सहा जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

दरम्यान बनावट नवरी जयश्री घोटाळे हिच्या सह तुकाराम भाऊराव मांगते (वय २३) बनावट मावशी मीरा बन्सी विसलकर (वय ३९ दोघेही रा अंबुजावाडी इगतपुरी घोटी, जि. नाशिक) एजंट शिवाजी शंकर कुरकुटे वय ६४ रा. कुरकुटेवाडी, बोटा, ता. संगमनेर जि. नगर) बाळू भिकाजी काळे (वय ४६ रा बोटा, ता संगमनेर जि. नगर) तसेच बाळू गुलाब सरवदे (वय ४१ रा गुंजाळवाडी, ता जुन्नर जि पुणे) या आरोपींना मंगळवार दिनांक ६ जून रोजी अटक करण्यात आली.

 या आरोपींनी संगनमताने जयश्री बाळू घोटाळे हिचा हरीश बळीराम गायकवाड (वय ३५  रा. खोडद, ता जुन्नर) याच्याशी २८ मे २०२३ रोजी आळंदी येथे व सागर प्रभाकर वायकर (वय ३३, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) यांच्याशी १० मे २०२३ रोजी जुन्नर येथे विवाह लावून दिला होता. हरीश गायकवाड यांच्याशी विवाह लावताना बनावट नवरी घोटाळे हिने अश्विनी रामदास गवारी (वय २५) व सागर वायकर यांच्याशी विवाह लावताना संध्या विलास बदादे (वय २३) असे नाव सांगण्यात आले होते.

हे लग्न जमवण्यासाठी या आरोपींननी वायकर यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये रोख तर हरीश गायकवाड यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये घेतले होते. लग्न लावल्यानंतर फसवणूक करणारी मुलगी धार्मिक विधीसाठी चार ते पाच दिवस सासरी राहत असे. त्याच्यानंतर मावशी मीरा बन्सी विसलकर ही नवरी मुलीला माहेरी घेऊन जात होती. त्यानंतर नवरी मुलगी दागिन्यासह फरार होत असे. या आशयाची तक्रार हरीश गायकवाड व सागर वाईकर यांनी नारायणगाव पोलीस स्थानकत २ जून २०२३ रोजी दिली होती. त्याच प्रकारे आळेफाटा येथे सुद्धा एका तरुणाची फसवणूक झाली आहे.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध लावण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती.पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, पोलीस कर्मचारी बांगर, काठमोरे, दरवडे व केंद्रे यांच्या पथकाने संगमनेर व नाशिक भागातून या आरोपींना अटक केली आहे.

 अशा पद्धतीने फसवणूक झालेल्या तरुणांनी संबंधित पोलीस स्थानकात तक्रार द्यावी असे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

Previous articleनागेश्वर विद्यालयात एकविस वर्षानंतर मैत्रीला आले उधान … !
Next articleटेम्पो ट्रॅव्हलर व मोटारसायकल अपघातात तीन जण ठार