कानसे मध्ये श्री काळभैरवनाथांचा यात्रामहोत्सव उत्साहात संपन्न

मोसीन काठेवाडी,आंबेगाव

कानसे गावचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथांचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावपुर्ण वातावरणात संपन्न झाला.

यात्रेदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह,कालाप्रसाद, रामनवमी उत्सव आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह कुस्त्यांच्या जंगी आखाड्याला मोठी गर्दी जमली होती.तर आखाड्यातील तरुणींच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या होत्या.सालाबादप्रमाणे यंदाही कानसे गावात श्रीकाळभैरवनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमित्ताने मुंबई,पुणे व अन्य जिल्ह्यांत नोकरी-व्यवसायानिमित्ताने स्थायिक झालेले ग्रामस्थही यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावात भावभक्तिचा मळा फुलविण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी उपस्थित श्रोत्यांना समुपदेशन केले.सप्ताहासह यात्रामहोत्सवात अनेक दानशूर व्यक्तींतर्फे मसालेवडी, पुरण-पोळी,आमरस,आदी स्वादिष्ट पक्वान्नांचे अन्नदान करण्यात आले होते.

दुर्गाष्टमीदिनी ग्रामदैवत काळभैरवनाथांच्या यात्रेनिमित्ताने हारतुरे, कालाप्रसाद,कीर्तन,भजन, काठी नाचवत निघणारी दंडवते,रात्री भैरवनाथांची पालखी,तसेच श्रीकाळभैरवनाथ धर्मदाय संस्था आणि ग्रामविकास मंडळ (मुंबई) यांच्या सौजन्याने स्वरगंध ही जाण कलेची हा लोकमनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तर नृत्य स्पर्धेलाही स्थानिक तरूणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दुपारी राम जन्मोत्सवानंतर संध्याकाळी कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.गावात तब्बल ६० वर्षानंतर प्रथमच भरलेल्या सर्वात मोठ्या आखाड्यात शेकडो मल्लांनी सहभाग घेतला होता.विशेष म्हणजे आखाड्यात तरुणींचाही सहभाग लक्षवेधी ठरला. यात समीक्षा आणि मानसी गव्हाणे या बहिणींची कुस्ती लक्षणीय ठरली. जवळपास १ लाख रूपये रोख रकमांसह आकर्षक ट्रॉफ्यांच्या पुरस्काराने विजयी मल्लांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी राहुल लोखंडे (नारायणगाव) याला चितपट करणाऱ्या अजय मुळुक (कोकण्यांची चिंचोली) याच्यासह माऊली बारवे (चास),संजय काळे (घोडेगाव),आदींसह नामवंत मल्ल क्रिशा काळे हिलाही गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांसह निवृत्त पोलिस अधिकारी दिलीप बोऱ्हाडे, प्रसिद्ध पहिलवान बाबुराव वाळुंज यांच्याहस्ते रोख रक्कमांसह आकर्षक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.

अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या यात्रा महोत्सवासाठी श्रीकाळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट,श्रीकाळभैरवनाथ धर्मदाय संस्था, श्रीकाळभैरवनाथ ग्रामविकास मंडळ,तसेच वाड्या-वस्त्यांतील मंडळांसह गाव आणि पंचक्रोशीतील तरूण कार्यकर्ते,महिला वर्ग आणि अबाल-वृद्धांनी अथक परिश्रम घेतले होते.

Previous articleश्रम क्षेत्राला दिशा देणारे भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अधिवेशन
Next articleतांबेवाडी खुनातील आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात ठोकल्या बेड्या