तांबेवाडी खुनातील आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात ठोकल्या बेड्या

नारायणगाव : (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील तांबेवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे यांच्या खुनाचा तपास अवघ्या २४ तासात लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तांबे बेपत्ता असलेली फिर्याद आळेफाटा पोलिसांत दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व आळेफाटा पोलीस यांच्या संयुक्त पथकाने योग्य तपास केल्याने आरोपींना तात्काळ अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.

तांबे यांचा खून करून त्यांचा मृतदेह एका विहिरीत फेकून दिल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. खून करण्यापूर्वी दोन आरोपी व किशोर तांबे हे एकत्र दारू पिण्यासाठी बसले होते. व्यावसायिक वाद व किरकोळ कारणावरून लोखंडी रॉडने किशोर तांबे यांच्या डोक्यात घाव घालून त्यांचा खून करण्यात आला व मृतदेह पोत्यात घालून व पोत्याला दगड बांधून विहिरीत ढकलून दिला होता. अशी माहिती आळेफाटा पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार राजू मोमीन, दिपक साबळे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, संदीप वारे, अक्षय नवले, दगडू वीरकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे, नवीन अरगडे, प्रशांत तांगटकर यांनी गोपिनीय बातमीदारा मार्फत या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरवत संशयित आरोपी पांडुरंग जिजाभाऊ तांबे (वय ३९ वर्ष रा. तांबेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे) व महेश गोरक्षनाथ कसाळ (वय ३० वर्ष रा. आळेफाटा, तालुका जुन्नर जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेतल्या नंतर त्यांच्या कडे कसून चौकशी केली असता किरकोळ वादातून हा खून केल्याची त्यांनी कुबुली दिली आहे.

दोन्हीही आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहे.

Previous articleकानसे मध्ये श्री काळभैरवनाथांचा यात्रामहोत्सव उत्साहात संपन्न
Next articleदौंड तालुक्यातील खामगाव येथे खून करून फरार झालेला आरोपी जेरबंद, यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई