सुवर्णा कोलते यांचा आदर्श ग्रंथपाल पुरस्काराने गौरव

 श्रावणी कामत

चाकण : पुणे जिल्हा व पुणे विभागीय ग्रंथालय संघ यांचे सासवडमध्ये पार पडलेल्या संयुक्त ग्रंथालय अधिवेशनात खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथील संतभारती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सुवर्णा प्रवीण कोलते यांना पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचा ‘आदर्श ग्रंथपाल पुरस्कार २०२३’ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, अधिवेशन समितीचे अध्यक्ष अरुण दांगट यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत देवकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

नाणेकरवाडी येथे १९९९ मध्ये स्थापन झालेले हे या परिसरातील जुने शासनमान्य मुक्तद्वार वाचनालय आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून सफाई कामगार महिलांचा सन्मान, किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन मेळावा, महिला बचत गटांना मार्गदर्शन, महिला सक्षमीकरणासाठी रोजगार व प्रशिक्षण, कार्यशाळा, एक किंवा दोन मुली असणाऱ्या दाम्पत्यांना सावित्रीबाई फुले कन्यारत्न पुरस्काराने गौरव,गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, आदर्श शिक्षक, कामगार, महिला, कार्यकर्ता पुरस्कार, विद्यार्थी दत्तक योजना, वृक्षारोपण, एड्स जनजागरण, चर्चासत्र, मेळावा, ग्रंथप्रदर्शन, वाढदिवसानिमित्त झाडे व पुस्तकभेट योजना, पर्यावरण, वृक्षसंवर्धन, हळदी-कुंकू, वक्तृत्व स्पर्धा, निबंध व काव्य लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, कोविड काळात गरजुंना किराणा वाटप, डॉक्टरांचा सन्मान, बाल साहित्य प्रदर्शन आदी समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.

Previous articleशिरदाळे येथे पारंपरिक पद्धतीने होळी व धुलवड साजरी
Next articleनायगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा