प्रा. डॉ. जे. पी. भोसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नारायणगाव : (किरण वाजगे)

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. पी. भोसले आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
प्रा. डॉ. भोसले यांना इन्फीनेट ग्लोबल रिसर्च फोरम पुणे, फर्नाखोन राजाभात विद्यापीठ, थायलंड आणि अँझम्शन विद्यापीठ, थायलंड यांचेकडून “एशिया – थाई एक्सलन्स एवॉर्ड – २०२३” हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
थायलंड देशाची राजधानी बँकॉक येथील अँम्बॅसेडॉर हॉटेल येथे “संशोधन, विकास आणि लीडरशीप प्रोजेक्ट” च्या कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा. डॉ. जे. पी. भोसले यांना आतापर्यंत पाच आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची ५७ संदर्भ व क्रमिक पुस्तके प्रकाशित झाली असून ५५ राष्ट्रीय आणि २५ आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी रिसर्च पेपर्सचे सादरीकरण केले आहे.
त्यांचे विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ३ रिसर्च प्रोजेक्टस पूर्ण झाले आहेत. बँकॉक, दुबई, कोलंबो – श्रीलंका आणि काटमांडू-नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी बीज भाषण आणि रिसोर्स पर्सन म्हणून सादरीकरण केले आहे.

विविध विषयांवर १५ राष्ट्रीय तर ५ आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन त्यांनी केले आहे. १४ पीएच.डी. तर २० एम.फील. च्या संशोधकांना त्यांनी संशोधनपर मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या नावावर तीन पेटंट पब्लिकेशन्स आहेत. चार आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल्सचे ते संपादकीय सदस्य आहेत. तर एका आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल्सचे मुख्य संपादक आहेत. धनबाद विद्यापीठ रांची, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील व्यवसाय प्रशासन व अकौंटन्सी अभ्यास मंडळावर तज्ञ प्राध्यापक सदस्य म्हणून ते काम करतात.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रा. डॉ. जे. पी. भोसले हे वाणिज्य व व्यवस्थापन विषयाचे अभ्यासक व प्रसिद्ध संशोधक, त्याचबरोबर कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या यशाबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर, उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रविंद्र पारगावकर, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य एस्.एस्. शेवाळे, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleनारायणगाव ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने प्रशासक सत्तेवर : विस्तार अधिकारी के.बी.मोरे यांनी स्वीकारला पदभार
Next articleवेगरेच्या सरपंचांचे अखेर सदस्यपद रद्द : पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश