खाजगीकरणाला महावितरण कर्मचाऱ्यांचा विरोध : तहसीलदारांना निवेदन सादर

योगेश राऊत ,पाटस

राज्यातील नवी मुंबई व ठाणे परिसरात महावितरणच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस समांतर परवाना न देण्यासाठी दौंड तालुक्यातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बुधवार (ता.२१) रोजी बाईक रॅलीकाढून खाजगीकरणास तीव्र निषेध नोंदवत तहसील कार्यालयात निवेदन सादर केले.

यावेळी महावितरणचे उपकार्यकरी अभियंता सागर कटके, वैभव पाटील, जीवन ठोंबरे, अमित धोत्रे, दौंड तालुक्यातील महावितरणच्या इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष महेश धाडवे, तांत्रिक कामगार युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब नरुटे, वीज कामगार काँग्रेस इंटकचे अध्यक्ष नितीन कुंभार, महा स्टेट इले. वर्क्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत शितोळे, इले. लाईनस्टाफ असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेलार, महा.रा. मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष दादा थोरात, मनोहर शेळके, शहाजी मेरगळ, हनुमंत शिंदे, तालुक्यातील महावितरणचे अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच राज्यातील तीस संघटना खाजगीकरणास तीव्र विरोध केला असून पुढील काळात वेगवेगळ्या पद्धतीने राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

दरम्यान, नवी मुंबई व ठाणे परिसरात अदानी इलेक्ट्रिकलने समांतर वीज वितरण करण्याचा परवाना मिळावा यासाठी वीज नियामक आयोगाकडे अर्ज दाखल केला असून अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला समांतर वीज वितरण करण्याचा परवाना देऊ नये याबाबत निषेधार्थ संयुक्त कृती समिती महावितरण कर्मचारी अधिकारी व अभियंता यांच्या उपस्थितीत दौंड उपविभागासमोर सभा पार पडली.

यापूर्वी राज्यातील नागपूर, जळगाव, भिवंडी, औरंगाबाद, मालेगाव, दिवा, मुंब्रा या ठिकाणी खाजगीकरणाचा अयशस्वी प्रयोग करण्यात आला होता. महावितरणच्या अधिकारी व कामगारांनी पाटस ते तहसील कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढून खाजगीकरणास विरोध दर्शविला. या वेळी कर्मचाऱ्यांनी “ऊर्जा क्षेत्र बचाव महाराष्ट्र बचाव” असा घोषणा देत खाजगीकरणास विरोध केला आहे. तसेच खाजगीकरणामुळे वीज ग्राहकांना दरवाढीचा फटका बसु शकतो, महाराष्ट्रातील १६ कोटी जनतेच्या २ कोटी ८८ लक्ष विज ग्राहकांच्या मालकीचा हा वीज उदयोग जगला पाहिजे व टिकला पाहिजे, केवळ यासाठी ही लढाई असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पुढील काळात राज्यातील सर्व तहसील कार्यालयावर मोर्चा व २३ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन विधानसभेवर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी, विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन वीज वितरण कर्मचाऱ्यांनी केले आहे.

Previous articleसंस्कार स्कुल दौंडमध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात संपन्न
Next articleभाऊसाहेब महाडिक यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड