भीमा पाटसचा ३९ वा गाळप हंगाम सुरू

योगेश राऊत , पाटस

मागील तीन वर्षापासून गाळप बंद असलेला व तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या मालकीचा असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ३९ वा गाळप हंगामाचा शुभारंभ दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुल व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१५) रोजी ऊसाची मोळी टाकून करण्यात आला.

यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता २५०० रुपये पंधरा दिवसांनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती निराणी ग्रुपचे अधिकारी रविकांत पाटील यांनी दिली.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, मागील तीन-चार वर्षांपासून भीमा पाटस कारखाना बंद होता. २१ ऑक्टोंबर २०२२ रोजी कायदेशीर करार झाल्याने २२ ऑक्टोंबर पासून कारखान्याचा मशिनरी व इतर यांत्रिक दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली. गाळप हंगामाची सुरुवात करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्या, मात्र सध्या कारखान्याच्या दुरुस्तीची काम पूर्ण झाल्याने कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने करण्यात येणार आहे. साडेपाच हजार टनापर्यंत गाळप होण्याइतपत ऊस तोडणी वाहतुकीचे नियोजन केले आहे. इथेनॉल ची क्षमता लहान असल्याने गाळपाच्या २० ते ३० टक्के इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. इथेनॉल सोबत साखरचे उत्पादन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चालू हंगामात शंभर दिवस गाळप सुरू राहणार आहे. कामगारांचे पगार बँक खात्यावर वेळेवर जमा करण्यात येणार आहेत. पुढील काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाला एफआरपी प्रमाणे दर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी हा कारखाना सुरू करण्यासाठी मोठी मदत केली आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, कामगारांनी सहकार्य करावे असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

Previous articleवि.शे.सातव विद्यालयात भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards (BIS) ची स्थापना
Next articleखोडद रस्त्यावरील पुणे नाशिक बाह्यवळण रस्त्यावर होणार भुयारी मार्ग ; खोडद ग्रामस्थांनी मानले खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे आभार