शिरूर लोकसभा मतदारसंघातील  विकासकामांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मंजुरी: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचविलेली १७.१९ कोटींची कामे मंजूर

उरुळी कांचन

जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यांतर्गत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचविलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील सुमारे १७.१९ कोटींच्या कामाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंजुरी दिली असून गेल्या काही महिन्यांपासून स्थगिती असलेली ही विकासकामे आता मार्गी लागणार आहेत.

पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीत निधी वाटपाचा आढावा घेऊन विकासकामांना पुन्हा मंजुरी देण्यात येईल अशी घोषणा करीत सर्वच आमदार – खासदारांनी नव्याने प्रस्ताव द्यावेत अशी सूचना केली होती. त्यानुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी सर्वप्रथम शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध कामांचे प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार ग्रामीण मार्ग ३ कोटी, नागरी सुविधा २.१५ कोटी, जनसुविधा २.५९ कोटी, ५०५४ अंतर्गत ३.४५ कोटी आणि साकव पुलांसाठी ६ कोटी अशा एकूण १७.१९ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यातील कामांना स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर बराच काळ लोटल्याने या कामांविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती. परंतु खासदार डॉ. कोल्हे यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री पाटील यांनी जवळपास सर्वच कामे मंजूर केल्यामुळे आता मार्चअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष आभार मानले असून विकासकामात राजकीय भूमिका आड येऊ नये यासाठी पालकमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. आता ही कामे लवकर सुरू व्हावीत यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहणार आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Previous articleटाकळकरवाडीत खेड बिटाच्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा संपन्न
Next articleआर्ट ऑफ लिव्हींगचे सहा दिवसाचे “आनंद अनुभूतीचे शिबिरास” उस्फूर्त प्रतिसाद