दौंड – पाटस मार्गावर भीषण अपघात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडकून तीन तरुणांचा मृत्यू

योगेश राऊत, पाटस

दौंड-पाटस, अष्टविनायक मार्गावरील हॉटेल स्वानंद समोरील रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून दुचाकी धडकून अपघात झाला. अपघातामध्ये दुचाकी वरील तीनही युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ऋषिकेश महादेव मोरे (वय 26), स्वप्निल सतीश मनुचार्य (वय 24), व गणेश बापू शिंदे (वय 26), ( तिघेही रा. जुना बाजार तळ,काष्टी, ता. श्रीगोंदा) अशी अपघातामध्ये जीव गमावलेल्या युवकांची नावे आहेत. दौंड पोलिसांनी ट्रॅक्टर चालक विशाल निवृत्ती दिवेकर (रा. वरवंड, दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार दि. 13 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वा. दरम्यान दौंड -पाटस अष्टविनायक मार्ग रस्त्यावर अपघात घडला. तिघे मित्र दुचाकीवरून पाटस गावाकडून दौंडला येत होते, या रस्त्यावरील हॉटेल स्वानंद समोरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरही दौंड च्या दिशेने चालला होता. पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरचा वेग अचानक कमी झाल्याने पाठीमागून येणारी या युवकांची दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरात धडकली. ट्रॅक्टरचा वेग अचानक कमी झाल्याने तसेच रात्रीचा अंधार व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकी चालविणाऱ्या युवकाला हा ट्रॅक्टरच दिसला नाही व त्यांची दुचाकी ट्रॉलीला धडकून अपघात झाला. अपघात होताच ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली सापडून मृत्यू होणे किंवा रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळेस ट्रॅक्टरच न दिसल्याने अपघात होणे या घटना नेहमीच्याच झालेल्या आहेत. या आधीही अशा अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वरील चालक बेफिकिरीने ट्रॅक्टर चालविताना दिसतात. वाहतूक करीत असताना ट्रॅक्टरमध्ये असलेल्या टेप रेकॉर्डवर मोठ्या आवाजात गाणी वाजवीतच चालक मार्गक्रमण करीत असतो. त्यामुळे त्याचे आजूबाजूने जाणाऱ्या वाहनांकडे लक्ष नसते.

पाठीमागून येणारी वाहने पुढे जाण्यासाठी त्यांना हॉर्न देऊन इशारा करीत असतात, मात्र ट्रॅक्टर चालक मोठ्या आवाजातील गाणी ऐकण्यातच दंग असतो. कधीकधी नाईलाजाने पाठीमागील वाहनांना चुकीच्या दिशेने वाहन चालवून पुढे जावे लागते व वेळप्रसंगी अपघात होतात. पोलिसांनी अशा प्रकाराला आळा घालणे जरुरीचे आहे

Previous articleएस एम जोशी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
Next articleसख्या आईचा मुलाने डोक्यात खोरे घालून केला खून ; जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे येथील घटना