उरुळी कांचन – महात्मा गांधी विद्यालयात १४ वर्षानंतर पुन्हा भरली आठवणींची शाळा

पुणे

“तेच मित्रमैत्रिणी, तीच वर्गाची खोली, तेच बेंच, तीच सकाळची प्रार्थना, तेच दुपारचे झाडाखालचे जेवण, तीच दोस्ती दुनियादारीचे” याचे दर्शन पुन्हा १४ वर्षांनी घडले आणि शाळेने अनुभवले. ज्याचे निमित्त होते स्नेह मेळाव्याचे. उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या २००८ मधील इयत्ता १० वी. च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत कमी दिवसांमध्ये नियोजन समितीने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करून देखील आपापल्या कामामध्ये व्यस्त असणारे २५० हुन अधिक माजी विद्यार्थी आपल्या शाळेतील जुन्या मित्र मंडळींना भेटायला आणि शाळा व शिक्षकांप्रती आदर व्यक्त करायला या स्नेह मेळाव्यात सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते बुद्धीची देवता श्री गणेश आणि शारदा पूजन झाले. सर्व आजी माजी शिक्षक वर्गाचे स्वागत स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुछ देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमाने भारावून गेलेल्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत आणि शाळेतील जुन्या आठवणी सांगून स्नेह मेळाव्याला आणखी रंगत आणली. कार्यक्रमादरम्यान याच बॅच मधील माजी विद्यार्थी तुषार लोंढे यांनी वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांची सुबक अशी काढलेली रांगोळी कार्यक्रमाची आकर्षण ठरली.

त्यानंतर दुपारच्या सत्रात शाळेच्या आवारात वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच आपापल्या वर्गामध्ये बसून पुन्हा तब्बल १४ वर्षानंतर वर्ग भरवण्यात आले. शाळेतील काही आठवणींना आणखीन उजाळा देण्यासाठी त्यावेळी भेटणारे चिंचा, गोळ्या, बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले.

शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी वार्षिक फी आणि शालेय उपयोगी वस्तू खरेदीसाठी देणगी स्वरूपात कार्यक्रमातून उरलेली काही रक्कम प्राचार्य भारत भोसले यांच्याकडे सर्व माजी विद्यार्थ्यांतर्फे नियोजन समिती सुपूर्त करणार आहोत असे निखिल कांचन यांनी सांगितले.

कार्यक्रमात सहभागी शिक्षकांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे नियोजन समितीच्या विद्यार्थ्यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन समितीच्या विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून केले होते.

नियोजन समिती पुढीलप्रमाणे:-
निखिल कांचन, अलंकार कांचन, अभिजीत गायकवाड, सदेंश कांचन, निलेश कानकाटे, तुषार लोंढे , आबासाहेब दोरगे, अजिंक्य तुपे, निखील चोरडीया, रविराज बडेकर,गौरी कांचन, अदीती पवार , धनश्री सणस, पुनम झेंडे , प्रज्ञा कुंकूलोळ, निकीता जोशी, संध्या गाडे, अश्विनी कुलकर्णी , अश्विनी पाडंकर, नेहा म्हेत्रे, शितल बधे, प्रियंका कांचन, राजश्री तुपे, पुजा चौरगुंडी, दीपाली चौधरी, राणी मदने सह अनेक विद्यार्थी यांचे योगदान आहे.

Previous articleशोगन केमिकल कंपनीत तीव्र स्फोट
Next articleअष्टापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोमनाथ कोतवाल यांची बिनविरोध निवड