पाटस येथे गोठ्यातून शेळ्यांची चोरी , अज्ञातांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा दाखल

योगेश राऊत ,पाटस

दौंड तालुक्यातील पाटस येथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी गोठ्यातील दोन शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की रविवार ( ता. ११) रात्री १० च्या सुमारास पाटस दौंड अष्टविनायक मार्गावरील पाटस हद्दीत गार फाटा येथील शेतकरी अमोल होले यांच्या घरासमोरील गोठ्यात एक गाई व तीन शेळ्या होत्या. परंतु सकाळी उठून पाहिले असता होले यांना त्यांच्या गोठ्यात दोन शेळ्या दिसल्या नाहीत. त्यांनी आसपासच्या परिसरात शेळ्यांचा शोध घेतला मात्र त्या सापडल्या नाहीत. रस्त्यालगत घर आणि गोठा असल्याने अज्ञात चोरट्यांनी दोन शेळ्या दावे तोडून चोरून घेऊन गेल्याचा संशय त्यांना आला. या प्रकरणी होले यांनी फिर्याद दिल्याने यवत पोलीस ठाण्यात शेळ्या चोरी केल्याने अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार सागर चव्हाण करत आहेत.
दुचाकी व चारचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र आता पाळीव प्राणी चोरी होण्याच्या घटना ही घडू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Previous articleहवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर
Next articleनिधन वार्ता : जुन्या पिढीतील कापड व्यावसायिक माधव क्षीरसागर यांचे वृद्धापकाळाने निधन