६५ वर्षांच्या शिवकन्यांनी जिंकली शिवप्रेमींची मने !

राजगुरूनगर- तरुणाईला लाजवेल अशा कणखर बाण्यामध्ये शिवनेरी किल्ला एका दमात चढून शिवगीते, पोवाडा आपल्या सुरेल मर्दानी आवाजात गात ६५ वर्ष वयाच्या भगिनींनी शिवप्रेमींची मने जिंकली.

खेड तालुक्यातील वाकळवाडी गावच्या पवळे घराण्यातील माहेर आणि शेलपिंपळगाव मोहितेवाडीच्या पोतले परिवाराच्या सूना असलेल्या विमलबाई महादेव पोतले (वय ६५) आणि यमुनाआक्का ज्ञानेश्वर पोतले (वय ६०) या बहिणी पायी शिवनेरी किल्ल्यावर आल्या होत्या. शिवाई देवीचे दर्शन घेऊन संपुर्ण किल्ला पायी फिरुन पाहिला आणि शिवजन्मस्थळावर माथा टेकवून त्यांनी आपल्या सुरेल पहाडी आवाजामध्ये ‘बाल शिवाजीचा’ शिवजन्म पोवाडा गायला. त्याचबरोबर…
“शिवाजीराजे होऊन गेले
गाजवली तलवार।
आपण त्यांच्या वंशी जन्मलो
का पडलो थंडगार॥
स्वातंत्र्याचे निशान
आम्ही नाही सोडणार।
भारताचे निशाण
आम्ही नाही सोडणार॥
अशा गीतांनी सारे मंत्रमुग्ध झाले. मुळातच पवळे मंडळी हि मूळची शिवनेर पायथ्याजवळ बस्ती सावरगावची, जसे बाल शिवराय पुण्यात लाल महालाकडे राहायला निघाले तशी हि मंडळी पेठ, वाकळवाडी, रेटवडी, शिरोली, काळूस, पिरंगुट पर्यंत विसावत गेली. लालमहालाजवळ आजही पवळे चौक आहे, चाकणच्या लढाईत पवळे बंधूंच्या पराक्रमाची नोंद आहे. अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शिवकन्या शिवनेरीवर सगळ्या तरुणाईचे आकर्षणबिंदू ठरल्या, अनेकांनी त्यांच्या पोवाडा व गीतांचे व्हिडीओ काढले, सेलिब्रिटींसारखे त्यांच्यासोबत सेल्फी काढले.

“तरुण पिढीने गड किल्ल्यांना भेटी देऊन आपला ऐतिहासिक वारशाचा अभिमान जपावा आणि किल्ल्यांचे पावित्र्य राखावे” असे आवाहन या भगिनींनी केले.

यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे बंधू शिक्षकनेते धर्मराज पवळे, माऊली गोरडे, अक्षय गोरडे, राजवेद पवळे, कल्पना रेटवडे, विजया पवळे आदि शिवप्रेमी सोबत होते.

Previous articleमनिषा मदने यांना आदर्श क्रीडा शिक्षिका तर आदर्श क्रीडा संघटक पुरस्कार धनंजय मदने यांना प्रदान
Next articleआर्थिक संस्थेत राजकारण व हस्तक्षेप नको – आमदार अतुल बेनके