खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आवाहन केलेल्या महरक्तदान शिबिरात ३४९६ रक्ताच्या पिशव्या संकलित

नारायणगाव : (किरण वाजगे)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात १४ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ४० ठिकाणी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले.या शिबिरात सर्व मिळून ३४९६ रक्त पिशव्या जमा झाल्या. सर्वाधिक १२६८ रक्तांच्या पिशव्यांचे भोसरी विधानसभा मतदारसंघात संकलित झाले.

खासदार डॉक्टर कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात स्वतः रक्तदान करून या रक्तदान शिबिराच्या मोहिमेचा शुभारंभ केला. जुन्नर, आंबेगाव खेड, आळंदी, शिरूर आंबेगाव, हडपसर आणि भोसरी या सहा विधानसभा मतदारसंघात एकूण ४० रक्तदान केंद्रामध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून प्रतिसाद दिला.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सहा लाख रुपयांचे सुरक्षा कवच व त्यामध्ये तीन लाखांचा अपघाती खर्च वैद्यकीय विमा आणि जीवित हानी झाल्यास कुटुंबाला तीन लाख रुपये अशा स्वरूपात विमा देण्यात आला. रक्तदान करणाऱ्यांना आजीवन मोफत रक्त दिले जाणार असून त्यांच्या नातेवाईकांनाही वर्षभर मोफत रक्तपुरवठा केला जाणार आहे.

खासदार डॉ कोल्हे यांनी दिवसभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराला भेट दिली. नारायणगाव येथील रक्तदान शिबिरात विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी ४२ व्या वेळी रक्तदान केले. त्याबद्दल युवा नेते अमित बेनके यांच्या हस्ते किरण वाजगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या रक्तदान शिबिरात भोसरी येथे १२७२, जुन्नर येथे ७७६, शिरूर येथे ४७८, आंबेगाव येथे ४७७, हडपसर येथे ३९७, खेड येथे ९७ जणांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.

प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Previous articleमृत वीज कंत्राटी कामगारांच्या वारसांना ( CSR फंडातून ) आर्थिक मदत देण्याची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी
Next articleविद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी दहीहंडी सोहळा