मारूती कुलकर्णी प्राणिमात्रांवर अफाट प्रेम असणारा माणूस – ओंकार कांचन

उरुळी कांचन

ब्राम्हण कुळात जन्मलेला हा मारुती, परिस्थितीने जरी दीन दुबळा असला, तरी सुद्धा वागण्यात ,बोलण्यात त्याचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वक्तशीरपणा , ठळक दिसायचा.हा व्यक्ती मी लहानपणापासून बघत आलोय, आमच्या आळीतील हा मारुती, नावाप्रमाणेच आजन्म ब्रह्मचर्येचा पालन करणारा. केस नेहमी विस्कटलेले, कपडे नेहमी मळलेली, हातात एका काठी, आणि दुसऱ्या हातात पिशवी. सतत बिडी ओढत, गावातल्या महादेव मंदिराच्या कडेला बाकावर शांत बसलेला मारुती मी खूप जवळून पाहिलाय, त्या सोबत आळीतल्या प्रत्येक व्यक्तीने त्याला भरभरून प्रेम दिलंय. गेल्या काही दिवसांपूर्वी हा आजारी पडला, आणि त्यात तो घसरून पडला, त्याची प्रकृती त्या नंतर खालावत गेली. शेवटी रक्ताची माणसं कामी न येता, त्याच बालपण जिथे गेलं, तिथली बरीच मंडळी कामी आली, पण प्रत्येकाला एक मर्यादा असते. काही दिवसांपूर्वी त्याला ससूनच्या गाडीत पाठवून उपचारासाठी सोडण्यात आलं.

किशोर कुमारची गाणी ऐकत आयुष्य फकिराप्रमाणे जगणारा एक इमानी माणूस..आता तो कसा आहे, कुठे आहे कोणालाच माहीत नाही. पण याच्या बद्दल सांगायचं झालं तर हा माणूस परिस्तिथीने गरीब असेल, पण प्राण्यांवर प्रेम करणारा हा खूप श्रीमंत माणूस मी तरी आजपर्यंत पाहिलेला नाही असे युवा सामाजिक कार्यकर्ते ओंकार कांचन यांनी सांगितले.

मारुतीने आयुष्यभर उपजीविकेसाठी खूप कामे केली.
पण कधीही पोटाला कमी आहे म्हणून कोणासमोर हात पसरले नाहीत. याला कधीही बघितलं, तरी याच्या मागे दहा ते पंधरा कुत्री सतत फिरत, कित्तेक वेळेला आळीतली बेवारस कुत्री सुद्धा याच्या अंथरुणात झोपलेली मी पाहिलीयत. माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनासुद्धा परके न समजणारा मारुती आज ससून मध्ये बेवारस म्हणून पडलाय याच खरचं वाईट वाटतय. हा माणूस स्वतः पोटाला कमी खायचा पण रोज नित्यनियमाने कुत्रांसाठी बिस्किटे घेऊन स्वतःच्या हाताने प्रत्येकाला भरवायचा, कुत्रांची भाषा खरंच त्याला कळत होती. याच कुत्रांवर आणि कुत्र्याचं याच्यावर इतकं प्रेम होतं की याला जेव्हा ससून नेलं त्यानंतर दोन दिवस आळीतली कुत्री नुसती सैरभैर फिरत होती. या आशेने की त्यांचा दाता आताच, येईल, मगच येईल.

स्वतःच्या ताटातला घास काढून आपण एखाद्या कुत्र्याला देऊ शकतो. पण स्वतःच सगळं ताट कुत्र्यांना देऊन स्वतः उपाशी राहून त्यांचं पोट भरणारा हा मोठा माणूस, कुठे आहे, कसा आहे माहीत नाही. जाता येता रोज मला आवाज देऊन दोन शब्द बोलणारा मारुती आज आळीतल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात आहे.

काही काही लोक आज अश्या व्यक्तींना थोडं अंतरावर ठेऊन वागतात, कारण त्यांना कमी पणा वाटतो, त्यांचं status त्यांना जपायचं असतं. पण मग मला अश्या लोकांबद्दल नेहमी वाटत की कसलं हो तुमचं स्टेटस, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून , स्वतःला पुण्य लाभेल असा स्वार्थी विचार मनात ठेवून तुम्ही कुत्र्यांना बिस्कीट देताल, एकदा देताल, दोनदा देताल, पण इथे स्वतःच्याच भुकेची सोय नसताना, काही ही करून त्या कुत्र्याचं पोट गेली २५ वर्ष भरणारा मारुतीसोबत आपलं status शून्य आहे.

पण खरं सांगू का ? घर संसाराला पारख्या असणाऱ्या या अमिराची फकिरी जमा खर्चाच्या वह्या वाचता येणाऱ्या लोकांना कधीच कळली नाही, याच दुःख वाटत. स्वतःच्या दुःखावर कधीही न गहिवरणारा हा माणूस एखाद कुत्रा आजारी पडला तर गहिवरून यायचा, तेव्हा व्यावहारिक जगाच्या दुनियेत वावरणाऱ्या माणसानच्यात या माणसाच्या माणुसकीचा निराळाच रंग उठून दिसायचा. कुणाच्या जीवनाला चौकट मानवते. कुणाचं जीवन रांगोळीच्या कणांनासारखे विस्कटण्यातच रमते. रांगोळीतला प्रत्येक कण पडेल तिथे आपला रंग घेऊन पडतो तशी ही माणसे जातील तिथे रंग नेतात. नातेवाईकांच्या चौकटीत, शिस्तशीर समाजाच्या चौकटीत त्या रंगाचा जुळता रंग त्यांना कधीच सापडत नाही. मग आपल्याशी जमणारा रंग शोधत आजन्म हिंडतात. या माणसांची कुळे निराळी, कुळाचार निराळे. आवशक्य गरजा सुटत नाहीत, कितीही चुकवायच्या म्हटल्या म्हणून चौकटी नशिबाला चुकवत नाहीत, आणि अश्या प्राणाची सतत फरफट चालूच असते. आता रोज मी गावात जातो, तेव्हा मात्र मंदिरालगतचा तो बाक, त्यावर बिडी घेऊन पायाशी असणारी कुत्री आणि त्याने दिलेला “पाटील” हा आवाज परत कधी ऐकू येईल माहीत नाही.

पण समाजाच्या नजरेत फकीर असलेला हा माणूस कुत्र्यांच्या नजरेत आणि आमच्या सारख्या त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आळीतल्या सगळ्यांच्या नजरेत खूप श्रीमंत होता. मारुती काकाच्या या जन्माच कर्म देवाच्या खातेबुकात नक्की स्वीकारलं जाईल आणि पुढील जन्मी त्याला खरंच सगळ्या गोष्टी परमेश्वर नक्कीच देईल यात शंका नाही. जिथे तू असशील तिथे सुखरूप रहा तुला उदंड आयुष्य लाभो.

शब्दसंकल्पना ओंकार कांचन उरुळी कांचन (ता.हवेली)

Previous articleदिपक गृह स्कूलची कराटे मध्ये नेत्रदिपक कामगिरी
Next articleदौंड पोलीस व यवत पोलिसांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन