माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यानंतर जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांचा धक्कादायक निर्णय

नारायणगाव : (किरण वाजगे)

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेला सोडचिट्टी दिल्यानंतर आज शिवसेना जिल्हाप्रमुख व जुन्नर चे माजी आमदार शरद सोनवणे यांनी देखील शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांना आता योग्य निर्णय घ्यायची वेळ आली असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा पत्राद्वारे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.

त्यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, मागील दोन वर्षापासून आपण मला पुणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. एक शिवसैनिक म्हणुन मी आपला प्रथम ऋणी आहे. मागील तीन वर्षापासून आपले सरकार आलं आणि भारतीय जनता पार्टी सोबत आपली ४५ वर्षांपासून ची जी युती होती ती आपआपसांतल्या भांडणामुळे तुटली. आपण महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा निर्णय घेतला परंतु पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीमुळे शिवसैनिक खचत व संपत चालला होता.

काही दिवसांपूर्वी आम्ही आपणास भेटलो असताना तुम्ही आम्हाला सांगितले की नाईलाजाने आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशी तडजोड करून इथून पुढच्या काळात काम करावे लागेल. वरच्या पातळीचे राजकारण वेगळे आहे पण खालच्या तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच राजकारणी नेहमीच संघर्षाचं राहिला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीशी आमचं मनोमीलन होणार नाही. यामुळे मी आपल्या पदाचा सन्मान ठेवून माझे जिल्हाप्रमुख पद आपल्याकडे सुपूर्द करत आहे. आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पुन्हा एकदा कार्यरत राहणार आहे. ही जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आपण दुसऱ्या कोणालाही द्यावी. इच्छा नसताना मी आपल्यापासून बाजूला होत आहे.

Previous articleपवन गाडेकर यांच्या वाढदिवसा निमित्त रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने वृक्षारोपण
Next articleकंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरणार :भारतीय मजदूर संघ