ओतूर ते देहू आळंदी “पर्यावरण बचाव सायकलवारी” चे नारायणगावात स्वागत

किरण वाजगे,नारायणगाव

राजसुय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ओतूर ते श्रीक्षेत्र आळंदी व श्रीक्षेत्र देहू अशा सायकलवारीचे प्रस्थान आज दिनांक ०३ रोजी पहाटे साडेपाच वाजता ओतूर येथून झाले. या सायकलवारीला राजसुय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजयकिरण डुंबरे यांनी ओतूर मधून हिरवा झेंडा दाखविला.

“सायकल चलाओ, आरोग्य बचाओ” तसेच “पर्यावरण संवर्धन व संरक्षण” अशा संदेश देणारी ही सायकलवारी त्यानंतर श्रीक्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहराचे दर्शन घेऊन नारायणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन ही सायकल वारी घेऊन पुढे आळंदी व देहूकडे रवाना झाली. याप्रसंगी नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे अध्यक्ष सुदीप कसाबे, समाजसेविका मनीषा बांगर, हरिभाऊ जगदाळे, गणेश गाडे उपस्थित होते.

यावेळी सायकलवारीत सहभागी झालेल्या फाउंडेशनच्या संचालिका उर्मिला महाकाळ, डॉ सविता फलके, मनीषा डुंबरे, निशा ढोबळे, अनुराधा डुंबरे, पुनम महाकाळ, सुप्रिया डुंबरे, राधिका नलावडे, शिक्षिका रोहिणी वाकचौरे, दिपाली डुंबरे या दहा महिला या सायकलवारीमध्ये सहभागी झाल्या असून त्यांच्यासोबत गणेश गाडे हे केअर टेकर म्हणून सहभागी झाले आहेत. सायकलवारीत सहभागी झालेले या सर्व महिला भगिनींचा सरपंच योगेश पाटे व व्हा.चेअरमन किरण वाजगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन नारायणगावच्या प्रवेशद्वारावर सत्कार करण्यात आला. त्यानंतर ही सायकलवारी आळंदी व देहूकडे रवाना झाली.

Previous articleरोटरी क्लबच्या वतीने सोरतापवाडी येथील पुरोगामी विद्यालयाला डिजिटल क्लासरूमची व्यवस्था
Next articleड्रीम फाउंडेशन तर्फे आयुष्य घडविताना कार्यक्रमाचे आयोजन